20 September 2019

News Flash

‘स्कायवॉक’वर मेट्रोसाठी हातोडा!

दिवसभरात सुमारे ४० ते ५० हजार पादचारी या पुलांचा वापर करतात

विलेपार्ले, सांताक्रूझ, वांद्रे येथील पादचाऱ्यांना फटका; प्राधिकरणाच्या नियोजनावर रहिवासी व तज्ज्ञांचे प्रश्नचिन्ह

अंधेरी ते मंडालेदरम्यान धावणाऱ्या ‘मेट्रो २ ब’ या उन्नत मार्गिकेसाठी विलेपार्ले, वांद्रे व सांताक्रूझ येथील पादचारी पुलांच्या (स्कायवॉक) काही भागांवर हातोडा पडणार आहे. दिवसभरात सुमारे ४० ते ५० हजार पादचारी या पुलांचा वापर करतात. यामुळे या पादचाऱ्यांना पुन्हा गजबजलेल्या रस्त्यांवरूनच चालावे लागणार का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे, तर नियोजन करतानाच या सर्व गोष्टींचा विचार करणे अपेक्षित असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

वांद्रे व सांताक्रूझ रेल्वे स्थानक परिसरांत पादचाऱ्यांना चालणे सुखकर व्हावे या दृष्टीने २०१० ते २०११ या कालावधीत पादचारी पूल बांधण्यात आले. आता अवघ्या सात वर्षांच्या कालावधीत मेट्रोच्या कामांसाठी या पुलांचा काही भाग पाडण्यात येणार आहे. वांद्रे येथील संतोषनगर परिसरातील लकी जंक्शन येथे मेट्रोचे स्थानक बांधण्यात येणार आहे. या स्थानकासाठी एस.व्ही. रोडवरील पुलाचा वांद्रे मशीद ते वांद्रे तलाव येथे जाणारा भाग पाडण्यात येणार आहे, तर सांताक्रूझ पश्चिमेकडील पादचारी पुलाचाही काही भाग तेथे उभारण्यात येणाऱ्या स्थानकासाठी पाडण्यात येणार आहे. याचबरोबर विलेपार्ले रेल्वे स्थानकालगत असलेल्या स्कायवॉकचा भागही पाडण्यात येणार आहे. ‘मेट्रो २ ब’ हा २३.५ किमीचा उन्नत मार्ग असणार आहे. या मार्गात पादचारी पुलाचा अडथळा येत असल्याने ते पाडण्याचा निर्णय घेणे चुकीचा असल्याचे ‘जुहू नागरिक कल्याण समूहा’च्या सचिव झहिदा बंतावाला यांनी सांगितले. वांद्रे रेल्वे स्थानक परिसरातील गर्दीचा विचार करून या भागात पादचारी पूल उभारण्यात आला. आता लोकांना या पुलाची सवय झाल्यानंतर तो मेट्रोसाठी पुन्हा पाडण्यात येणार आहे. मग या पादचाऱ्यांची पर्यायी व्यवस्था काय असेल, असा प्रश्नही झहिदा यांनी केला आहे. अवघ्या सात वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला हा पूल पाडायची वेळ प्रशासनावर आली असेल तर ते विकास आराखडा कोणता दृष्टिकोन डोळय़ासमोर ठेवून करतात, असा प्रश्नही त्यांनी केला आहे.

शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभी करत असताना त्याचा परिपूर्ण अभ्यास करून नियोजन करणे अपेक्षित आहे. सध्याची व्यवस्था न कोलमडता पर्यायी मार्गाचा विचार करणे अपेक्षित असल्याचे वाहतूकतज्ज्ञ अशोक दातार यांनी नमूद केले. शहरात केवळ दोन ते तीन मेट्रो प्रकल्पच असणे अपेक्षित आहेत व ते सर्व भुयारी असावेत, असे मतही त्यांनी मांडले.

मेट्रोच्या मार्गिकेसाठी विलेपार्ले, वांद्रे व सांताक्रूझ येथील पादचारी पुलांचा रस्ता ओलांडून जाणारा काही भाग पाडण्यात येणार आहे. मात्र मेट्रोच्या स्थानकावर जाण्यासाठी खालून प्रवेश आणि बाहेर पडण्याचा रस्ता देण्यात येणार आहे. हे काम पुढील सहा महिन्यांत सुरू होणार असल्याचे एमएमआरडीएचे सहप्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी सांगितले.

First Published on June 16, 2017 3:55 am

Web Title: mumbai skywalk mumbai metro 2b