राज्यात गुटख्यावर बंदी असतानाही तो बेकायदापद्धतीने इथं दाखल होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. विरार येथील वालीव पोलिसांनी नुकत्याच केलेल्या एका कारवाईत कांद्याच्या वाहतुकीतून आणण्यात आलेला गुटखा पकडला आहे. या कारवाईत २० लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चालकाला अटक करीत त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

सध्याच्या टाळेबंदीच्या काळात पान टपऱ्या बंद आहेत. मात्र, तरीही बऱ्याच ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थ्यांची विक्री सुरू आहे. या तस्करींसाठी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांचा वापर केला जात आहे. विरार येथील वालीव पोलिसांनी असा एक प्रकार उघड केला आहे. त्यानुसार, कांद्याची अत्यावश्यक सेवा म्हणून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कारवाई करीत २० लाखांचा गुटखा पकडला आहे.

वालीव पोलिसांच्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी एक कांद्याचा ट्रक गुजरात वापीवरून नालासोपारा परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना एका खबऱ्याच्या माध्यमातून मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नालासोपारा पेल्हार येथे सापळा रचला आणि पोलिसांनी पाळत ठेवत पेल्हार येथे हा ट्रक अडवला.

या ट्रकमध्ये पोलिसांनी तपासणी केली असता सुरूवातीच्या काही गोण्या कांद्याने भरलेल्या होत्या तर पुढच्या काही गोण्यांमध्ये गुटख्याची पाकिटं होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत कारंडे आणि पोलीस हवालदार किरण साळुंखे यांनी ही माहिती दिली.