नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्यांची किंवा उपनगरांमधून मुंबईत येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्य, पश्चिम रेल्वे आणि बेस्ट प्रशासनाच्या वतीने विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. 31 डिसेंबरच्या मध्यरात्री मध्य रेल्वेकडून 4 स्पेशल ट्रेन चालविण्यात येणार आहेत, तर पश्चिम रेल्वेने विरार ते चर्चगेट चार आणि चर्चगेट ते विरार चार अशा एकूण आठ लोकल चालविण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय बेस्टनेही जादा गाडय़ांची सुविधा उपलब्ध केली आहे.

सीएसएमटी ते कल्याण धीमी लोकल मध्यरात्री 1.30 वा आणि कल्याण ते सीएसएमटी लोकल मध्यरात्री दीड वाजता सुटेल. तर सीएसएमटीहून पनवेलसाठी आणि पनवेल स्थानकातून सीएसएमटीसाठीही लोकल मध्यरात्री दीड वाजताच सुटतील. चर्चगेट ते विरारसाठीही लोकल मध्यरात्री 1.15 वा, मध्यरात्री 2.00 वा, मध्यरात्री 2.30 वा आणि मध्यरात्री 3.25 वाजता, तर विरार ते चर्चगेटसाठी मध्यरात्री 12.15 वा, मध्यरात्री पावणे एक वाजता, मध्यरात्री 1.40 वाजता आणि मध्यरात्री 3.05 वाजता लोकल सोडण्यात येणार आहेत.

बेस्ट उपक्रमानेही गेट वे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच आणि मुंबईतील इतर ठिकाणी समुद्र किनाऱ्यांवर आणि चौपाटीवर रात्रीच्या वेळी येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी बस क्रमांक 7 (मर्यादित) आणि बस क्रमांक 111, 112, 203, 231, 247 आणि 294 वर रात्री एकूण 20 एकमजली जादा बसगाडय़ांची सेवा असेल.