ऑक्टोबर हीटमध्ये पोळलेले मुंबईकर थंडीची आतुरतेने वाट पाहत असले आणि किमान तापमान वीस अंश सेल्सिअसखाली आले असले तरीही एवढय़ात थंडी येण्याची शक्यता नाही. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या उत्तरेला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्याच्या अंतर्गत भागात ढगाळ वातावरण राहील. या वातावरणात किमान तापमान कमी होण्याची फारशी शक्यता नाही. त्यामुळे पुढील आठवडाभर मुंबईचे सकाळचे तापमान १९ ते २० अंश से.दरम्यानच राहील, असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.
राज्याच्या अंतर्गत भागात नाशिक, पुणे, नांदेड येथे किमान तापमान १५ अंशांखाली येण्यास सुरुवात झाली आहे, तर दुपारचे कमाल तापमान ३२ ते ३५ अंश से.दरम्यान आहे. पश्चिम किनारपट्टीवर मुंबईसह कोकणात कमाल तापमान ३४ ते ३६ अंशांदरम्यान असून किमान तापमानही २० अंश से.पेक्षा जास्त आहे. मुंबईत सोमवारपासून किमान तापमान वीस अंशांपेक्षा कमी होण्यास सुरुवात झाली आहे. सांताक्रूझ येथे सोमवारी १९.९ अंश से. तर मंगळवारी १९.८ अंश से.ची नोंद झाली. नोव्हेंबरमधील सरासरी किमान तापमानापेक्षा हे तापमान दोन अंशांनी कमी आहे. मात्र ही थंडीची सुरुवात नाही, असे वेधशाळा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सध्या पूर्वेकडून येत असलेल्या वाऱ्यांचा प्रभाव जास्त आहे. राज्याच्या अंतर्गत भागातील तापमान कमी होत असले तरी किनारपट्टीवरील तापमानात घट होण्यासाठी वाऱ्यांची दिशा ईशान्य आणि उत्तरेदरम्यान होणे गरजेचे आहे. पुढील आठवडाभरातही वाऱ्यांची दिशा बदलण्याची शक्यता नाही. त्यातच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात काहीसे ढगाळ वातावरण राहणार आहे. या वातावरणात किमान तापमान खूप कमी होण्याची शक्यता नसते. पुढील साधारण सहा ते सात दिवस तरी वाऱ्यांच्या दिशेतही फारसा फरक होणार नसल्याने किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता नाही, असे वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
नोव्हेंबर महिन्यातील मुंबईतील गेल्या दहा वर्षांची नोंद पाहता पाच वर्षांतील किमान तापमान १८ अंश से. खाली गेलेले नाही. गेल्या दहा वर्षांत सर्वात कमी तापमान २६ नोव्हेंबर २००७ रोजी १४.४ अंश से. नोंदले गेले.