मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांना प्रत्यक्षात चढत्या उन्हाची भेट मिळाली आहे. लागोपाठ तीन दिवस तापमापकातील पारा ३६ अंश सेल्सिअसवर जात असून जूनमधील एका दिवसाचा अपवाद वगळता हे सर्वाधिक तापमान आहे. वेधशाळेने बुधवारीही तापमान ३६ अंश से. दरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
जूनमध्ये सरासरी तापमान ३२ अंश से. असते. गेल्या दहा वर्षांत २०१४चा अपवाद वगळता एकदाही कमाल तापमान ३६ अंशांवर पोहोचले नव्हते. या वेळी पहिल्यांदाच सलग तीन दिवस उच्च तापमानाची नोंद होत आहे.

मान्सून दोन दिवसांत पोहोचण्याचा अंदाज
अरबी समुद्रातील अशोबा वादळ दूर जात असल्याने मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होण्याच्या आशा वाढल्या आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत मुंबईसह कोकणात पावसाच्या सरी येण्याचा अंदाज आहे. ‘अशोबा’ या चक्रीवादळाने आपला मोर्चा ओमानच्या दिशेने वळवला आहे.