सप्टेंबर हीटमुळे अंगाची लाहीलाही होत असलेल्या मुंबईकरांना रविवारी या दशकभरातील सप्टेंबर महिन्यातील सर्वोच्च तापमानाच्या झळा सोसाव्या लागल्या. इतर वेळी रविवारी दुपारी जेवणावर आडवा हात मारून वामकुक्षी घेणाऱ्या मुंबईकरांचीदुपारची झोप चढय़ा पाऱ्यामुळे चांगलीच उडाली.
सांताक्रुझ येथे रविवारी तब्बल ३५.६ अंश सेल्सिअस एवढे कमाल तापमान नोंदवले गेले. २९ सप्टेंबर २०१० रोजी एवढेच तापमान नोंदवले गेले होते आणि हे तापमान दशकभरातील सप्टेंबर महिन्यातील सर्वाधिक तापमान मानले जाते. त्यामुळे येत्या दोन दिवसांत पारा हा उच्चांक मोडतो की काय, अशी धास्ती मुंबईकरांना वाटू लागली आहे. पावसाळ्यातील आल्हाददायक हवा मुंबईत हा हा म्हणता बदलली आणि परतीच्या वाऱ्यांबरोबर पावसाचे ढग हद्दपार झाले. त्यानंतर गेला आठवडाभर मुंबईकरांच्या अंगाची काहिली सुरू होती. दरम्यान, २५ सप्टेंबर रोजी पडलेल्या पावसामुळे २६ सप्टेंबर पासून वातावरणातील उष्मा आणखीनच वाढला. शनिवारी सांताक्रुझ येथे ३५.३ अंश सेल्सिअस एवढे कमाल तापमान नोंदवले गेले होते. गेल्या काही दिवसांत असलेल्या ३०-३२ अंश सेल्सिअस एवढय़ा तापमानावरून पाऱ्याने थेट चार अंशांची उसळी घेतली. तर शनिवारच्या तुलनेत पारा ०.३ अंश चढला. कुलाबा येथे ३५ अंश सेल्सिअस आणि सांताक्रुझ येथे ३५.६ अंश सेल्सिअस एवढय़ा तापमानाची नोंद रविवारी झाली. येत्या दोन दिवसांत ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता असल्याने मुंबईकरांना यंदा दशकभरातील सप्टेंबर महिन्यातील तापमानाच्या नव्या विक्रमाची झळ बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, शतकातील सप्टेंबर महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद २३ सप्टेंबर १९७२ रोजी झाली होती.