|| सुशांत मोरे

पुढील वर्षांत होणाऱ्या लोकसभा आणि राज्याच्या विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेवून मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयलसह राज्य सरकार, मध्य आणि पश्चिम रेल्वे, मुंबई रेल्वे विकास महामंडळाची धडपड सुरू आहे. परळ टर्मिनस, ठाणे ते दिवा पाचवा-सहावा मार्ग, वातानुकूलित लोकल गाडय़ांच्या कामांना गती देण्याचा विचार आहे. तसेच, ‘एमयूटीपी-३ ए’ला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळवण्याचाही प्रयत्न आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील सर्व बारा डबा लोकल पंधरा डबा करण्याचेही स्वप्न पाहिले जात आहे. परंतु मोठे प्रकल्प राबविताना जाणवणारी जागेची अडचण, तांत्रिक मुद्दे, खर्च पाहता यातला एक जरी प्रकल्प निवडणुकीआधी मार्गी लागेल का, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.

मुंबई उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गावरून दररोज ७५ लाखांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात. दिवसेंदिवस हा उपनगरी प्रवास त्रासाचा आणि जीवघेणा होत आहे. प्रवास सुकर होण्यासाठी गेल्या काही वर्षांत पश्चिम आणि मध्य रेल्वेवर मोठे प्रकल्प हाती घेण्यात आले. नऊ डबा उपनगरी गाडय़ा बारा डबा झाल्या. विद्युतीकरण झाल्याने नवीन उपनगरी गाडय़ा धावणे आणि त्यांचा वेग वाढण्यासही मदत झाली. विरारपासून पुढे डहाणूपर्यंत तर खारकोपपर्यंतही उपनगरी गाडी धावू लागली. एक वातानुकूलित उपनगरी गाडीही सेवेत आली, मात्र तरीही प्रवाशांचा प्रवास सुकर झालेला नाही.

रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमणे, त्यामुळे नवीन मार्ग तसेच प्रकल्प पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या अडचणी, उशिराने धावणाऱ्या उपनगरी गाडय़ा, स्थानकांतील सुविधांची जैसे थे परिस्थिती अशा अनेक कारणांमुळे प्रवाशांकडून फक्त रोषच व्यक्त केला जातो. आधीच रखडलेल्या प्रकल्पांना त्वरित मार्गी लावण्याऐवजी रेल्वेमंत्री पीयूष गोयल मात्र नवनवीन प्रकल्पांची घोषणा करताना दिसतात. सध्या मध्य रेल्वेवर एक आणि पश्चिम रेल्वेवर चार पंधरा डबा उपनगरी गाडय़ा धावत आहेत. जास्तीत जास्त प्रवाशांची एकाच उपनगरी गाडीतून वाहतूक व्हावी त्यासाठी पंधरा डबा उपनगरी गाडय़ांवर भर देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

मध्य रेल्वेने कल्याणपर्यंत जलद धावणाऱ्या पंधरा डबा उपनगरी गाडीचा विस्तार बदलापूर, टिटवाळापर्यंत करण्याचा निर्णय घेतला. जवळपास ४०० कोटींपेक्षा जास्त रक्कम असलेला प्रकल्प मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे आहे. तर पश्चिम रेल्वेने अंधेरी ते विरापर्यंतच्या स्थानकांवर असणारी गर्दी लक्षात घेता या दरम्यान पंधरा डबा धिम्या उपनगरी गाडय़ा चालविण्याचे स्वप्न बाळगले आहे. त्यासाठी फलाटांची लांबीही वाढवण्याचे काम सुरू केले आहे. गोयल यांनी सर्व उपनगरी गाडय़ा पंधरा डबा करण्याची चाचपणी करण्याच्या सूचना देऊन त्याचा अहवाल सादर करण्यास मध्य आणि पश्चिम रेल्वेला सांगितले. मात्र जागेची कमतरता, तांत्रिक मुद्दे, खर्च पाहता सर्व उपनगरी गाडय़ा पंधरा डबा करणे अशक्य आहे. चर्चगेट ते वांद्रेपर्यंत फलाटांची लांबी वाढवण्यासाठी जागाच नसल्याचे रेल्वे अधिकारी सांगतात. अशीच परिस्थिती मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते दादर आणि अन्य काही स्थानकांवरही आहे. त्यामुळे पंधरा डब्यांच्या उपनगरी गाडय़ांसाठी चाललेली घाई खुद्द रेल्वे अधिकाऱ्यांसाठीच डोकेदुखी ठरत आहे.

रेल्वेमंत्र्यांनी पश्चिम आणि मध्य रेल्वेवर सर्व उपनगरी गाडय़ा वातानुकूलित चालवण्याचा निर्धारही केला असून पुढील पाच वर्षांनंतर ३०० वातानुकूलित उपनगरी गाडय़ा धावल्या पाहिजे, असे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र सामान्य मुंबईकरांनी या गाडीकडे पाठच फिरविलेली पाहायला मिळते. त्यामुळे सहा डबे वातानुकूलित आणि सहा डबे बिगरवातानुकूलित अशी बारा डबा अर्धवातानुकूलित उपनगरी गाडी चालविण्याच्या दृष्टीनेही पडताळणी सुरू आहे. परंतु अर्धवातानुकूलित उपनगरी गाडी चालविताना मोठय़ा प्रमाणात तांत्रिक बदल करावे लागणार आहेत. आणि ते केले नाहीत तर तांत्रिक अडचणींचा सामना रेल्वे प्रशासनाला करावा लागणार आहे. त्यामुळे हे स्वप्न कधी पूर्ण होईल? हे सांगता येणे अशक्य आहे.

मुंबईकरांसमोर सर्वात मोठी डोकेदुखी आहे ती उपनगरी गाडय़ांच्या वक्तशीरपणाची. नवनवीन प्रकल्पांची घोषणा करण्याऐवजी गाडय़ांच्या वक्तशीरपणात सुधारणा करा, अशी प्रवाशांची मागणी आहे. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी अनेक कारणास्तव उशिराने धावणाऱ्या उपनगरी गाडय़ांमुळे त्यांचा वक्तशीरपणाच बिघडतो. परिणामी प्रवाशांना अधिकाधिक गर्दीतून प्रवास तर करावा लागतोच, शिवाय कामानित्तित घराबाहेर पडलेला मुंबईकर नियोजित ठिकाणी वेळेतही पोहोचू शकत नाही. लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाडय़ांचा वक्तशीरपणात सुधारणा करण्याचे आदेश रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मध्य, पश्चिम रेल्वेला दिले. मात्र त्यात काही सुधारणा झालेली नाही.

ठाणे ते दिवा पाचवा-सहावा मार्ग, परळ टर्मिनससाठी प्रयत्न

दहा वर्षांपूर्वी मंजुरी मिळूनही पूर्ण होऊ न शकलेला ठाणे ते दिवा पाचवा-सहावा मार्ग त्वरित पूर्ण करा, असे आदेश रेल्वेमंत्री गोयल यांनी मुंबई रेल्वे विकास महामंडळ आणि मध्य रेल्वेला दिले आहेत. गेल्या काही दिवसांत गोयल यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या बैठकांमध्ये हा मार्ग आणि परळ टर्मिनसचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. ठाणे ते दिवा पाचवा-सहावा मार्गाची १२० कोटी रुपये असलेली प्रकल्प किंमत थेट ४४० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. त्यातच प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आधी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आल्यानंतर मार्च २०१९ अशी नवी मुदतही ठरवण्यात आली. मात्र आता हीच मुदत जून २०१९ पर्यंत गेली आहे. परळ टर्मिनसही मार्च २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट  आहे. परंतु त्याआधीच डिसेंबर अखेरीस काम पूर्ण करून जानेवारीपासून परळहून कल्याणच्या दिशेला लोकल सोडण्याचा मध्य रेल्वेचा प्रयत्न आहे.

एमयूटीपी-३ ए ला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी धडपड

मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या ५४ हजार कोटी रुपयांच्या एमयूटीपी-३ ए ला गेल्या अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली. राज्य सरकारनेही नुकतीच मंजुरी दिल्यानंतर आता रेल्वे बोर्ड, निती आयोग आणि केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी घेण्यात येईल. राज्य सरकारकडून मंजुरीसाठी प्रयत्न करतानाच महामंडळाने रेल्वे बोर्डाकडेही प्रस्ताव पाठवून ठेवला होता. लोकसभा निवडणुकीआधी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून एमयूटीपी-३ ए साठी मंजुरी घेण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यासंदर्भातही नुकतेच मुंबईत आलेल्या रेल्वेमंत्री गोयल यांनी मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना तातडीने बोलावून यासंदर्भात चर्चाही केली. त्यामुळे येत्या निवडणुकांआधी या मोठय़ा प्रकल्पांच्या कामांना गती दिल्याची घोषणा केली जाऊ शकते.