News Flash

एसी लोकल, सिग्नलला बळ!

दर चार मिनिटांनी सुटणारी लोकल ही दोन मिनिटांनी सुटणार आहे.

|| सुशांत मोरे

‘एमयूटीपी ३ए’मधील प्रकल्पांसाठी सात हजार कोटी देण्याची बँकांची तयारी :- मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील १९१ वातानुकूलित लोकल आणि सीबीटीसी (कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल) या अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा प्रकल्पांना गती मिळणार आहे. एमयूटीपी-३ एमध्ये असलेल्या या दोन महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी एशियन इन्फास्ट्रक्चर बँक (एआयबी)आणि न्यू डेव्हलपमेंट बँकेने निधी देण्यास तयारी दर्शवली आहे. दोन्ही प्रकल्पांसाठी एकूण सात हजार कोटी रुपयांचा निधी टप्प्याटप्प्यात मिळणार असल्याची माहिती प्रकल्पांवर काम करणाऱ्या एमआरव्हीसीतील (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

एमआरव्हीसीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यू डेव्हलपमेंट बँकेकडून १९० वातानुकूलित लोकलसाठी ३ हजार ५०० कोटी रुपये आणि एआयबीकडून सीबीटीसी सिग्नल यंत्रणेसाठी ३ हजार ५०० कोटी रुपये मिळतील. हा निधी प्रत्यक्षात मिळण्यासाठी सप्टेंबर किंवा ऑक्टोबर २०२० उजाडणार आहे. त्याआधी निधीसाठी सर्व प्रक्रिया आणि या दोन प्रकल्पांच्या कामांसाठी निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती दिली. सीबीटीसी यंत्रणा पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते विरार, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सीएसएमटी ते कल्याण आणि हार्बरवर सीएसएमटी ते पनवेल मार्गावर राबवली जाणार आहे. सध्या या तीनही मार्गावर मानवी पद्धतीने सिग्नल यंत्रणा हाताळली जाते; परंतु सीबीटीसी सिग्नल यंत्रणा संपूर्णपणे डिजिटल असून यात मोटरमनला बसल्या जागी वेगासंबंधात नियंत्रण कक्षाकडून सिग्नलद्वारे झटपट सूचना मिळतील. तसेच पुढे  धावत असणाऱ्या लोकल गाडय़ांसंदर्भातही अचूक सूचना मिळेल. यामुळे लोकल वेळेत धावतील आणि भविष्यात लोकल फेऱ्यांची संख्याही वाढण्यास मदत मिळणार आहे. तर दर चार मिनिटांनी सुटणारी लोकल ही दोन मिनिटांनी सुटणार आहे. दोन्ही प्रकल्प सेवेत येण्यासाठी साधारण पाच वर्षांची मुदत असेल.

१९१ वातानुकूलित लोकल गाडय़ांचा मार्ग मोकळा

पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर सध्या भेल कंपनीच्या बारा वातानुकूलित लोकल गाडय़ा दाखल करण्याचे उद्दिष्ट होते. यातील चार लोकल पश्चिम रेल्वेवर आणि एक लोकल मध्य रेल्वेवर दाखल झाल्या आहेत. एमयूटीपी-३ एमध्येही आणखी १९१ वातानुकूलित लोकल मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी आणल्या जाणार आहेत. प्रकल्पाची एकूण किंमत १५ हजार ८०२ कोटी रुपये असून आता बँकेकडून ३ हजार ५०० कोटी रुपये मिळतील. तर उर्वरित निधी हा राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडूनही मिळणार आहे. सीबीटीसी प्रकल्पालाही उर्वरित निधी राज्य सरकार व रेल्वेकडून मिळेल.

 

सीबीटीसी प्रकल्पाचा खर्च

  • मार्ग                                                       प्रकल्प किंमत(रु.)
  • सीएसएमटी ते पनवेल                          १ हजार ३९१ कोटी
  • सीएसएमटी ते कल्याण                       २ हजार १६६ कोटी
  • चर्चगेट ते विरार                                  २ हजार ३७१ कोटी

३३,६९० कोटी रुपये  एमयूटीपी ३ ए प्रकल्पाची  किंमत

अंतर्गत प्रकल्प

  •  हार्बर मार्गाचा बोरिवलीपर्यंत विस्तार
  •  बोरिवली ते विरार पाचवा-सहावा मार्ग
  • कल्याण ते आसनगाव चौथा मार्ग
  • कल्याण ते बदलापूर तिसरा व चौथा मार्ग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 12:10 am

Web Title: mumbai suburban railway ac local singal mutp project akp 94
Next Stories
1 अमन लॉज-माथेरान मिनी ट्रेन आजपासून सुरू
2 म्हाडा ‘बृहद्सूची’वरील सव्वाशे देकार पत्रे रद्द होणार?
3 करमाफीच्या घोळामुळे २.२० लाख मालमत्ताधारक देयकांपासून वंचित
Just Now!
X