News Flash

आणखी किती बळी जाणार?

२०१६ आणि २०१७ या वर्षांत मिळून लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाडीतून पडून एक हजार ३११ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची नोंद लोहमार्ग पोलिसांकडे आहे.

मुंबई उपनगरी रेल्वे मार्गावर अपघात सत्र कायम; सुरक्षा प्रयोगही फसले

गर्दीच्या वेळी लोकलमधून पडून अनेक प्रवाशांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. गुरुवारी एक २३ वर्षीय तरुणी लोकलमधून पडून गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर पुन्हा एकदा लोकलच्या गर्दीतील प्रवासातून सुटका करण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपायांवर प्रश्न उपस्थित झाला आहे. २०१६ आणि २०१७ या वर्षांत मिळून लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाडीतून पडून एक हजार ३११ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची नोंद लोहमार्ग पोलिसांकडे आहे.

नोव्हेंबर २०१५ मध्ये डोंबिवलीला राहणाऱ्या भावेश नकाते या २१ वर्षीय तरुणाचा गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अपघात रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांसाठी रेल्वेकडून एक समिती स्थापन करण्यात आली आणि या समितीकडून अनेक उपाय सुचविण्यात आले. त्यानंतर मध्य रेल्वेने गर्दीच्या वेळी कल्याण येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेसमधून प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा दिली. यासाठी तिकिटाप्रमाणेच कूपन्सही देण्यात आले. मात्र हा प्रयोग फसला. त्यानंतर लोकल गाडय़ांमधील आसने कमी करून डब्यात प्रवाशांना उभे राहण्यासाठी जास्तीत जास्त जागा निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र त्यातही मध्य रेल्वेला अपयशच आले. या दोन प्रयोगांनंतर सामान्य लोकल गाडय़ांच्या डब्यांना पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून स्वयंचलित दरवाजा बसविण्याचा प्रयोग करण्याचा निर्णयही घेण्यात आला. मात्र हा प्रयोगही मागे पडला. त्यामुळे अद्यापही लोकलच्या गर्दीमुळे पडून होणाऱ्या अपघातांना आळा बसू शकलेला नाही. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर २०१७ मध्ये विविध अपघातांत ३,०१४ प्रवाशांचा मृत्यू झाला. यापैकी ६५४ प्रवासी लोकलमधून पडून मृत्युमुखी पडल्याचे उघड झाले आहे. तर तब्बल १,४३४ प्रवासी जखमी झाले. २०१६ मध्येही हीच परिस्थीती राहिली होती. ६५७ प्रवाशांचा लोकल गाडीतून पडून मृत्यू झाल्याची नोंद लोहमार्ग पोलिसांकडे आहे. यामध्ये लांब पल्ल्याच्या गाडीतूनही पडून मृत्यू किंवा जखमी झालेल्या प्रवाशांची नोंद फार कमी आहे.

रूळ ओलांडताना १,६५१ जणांचा मृत्यू

रूळ ओलांडून होणाऱ्या अपघातानाही आळा घालण्यात रेल्वेला अपयशच आले आहे. २०१७ मध्ये रूळ ओलांडताना १,६५१ जणांचा लोकलच्या आणि लांब पल्ल्याच्या गाडीच्या धडकेत मृत्यू झाला आणि ३७६ जखमी झाले आहेत. २०१६ मध्ये अशाच प्रकारच्या घटनेत एक हजार ७९८ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. रुळाजवळ संरक्षक भिंत बांधणे किंवा दोन रुळांमध्ये तारांचे कुंपण उभारण्यात येत आहे. मात्र रुळाच्या शेजारीलच झोपडय़ांजवळ असलेल्या संरक्षक भिंतींना भगदाड पाडून शॉर्टकटचा मार्गही शोधण्यात आलेला असतो. त्यामुळे अपघात होतात.

२०१७ मध्ये ठाणे स्थानक आणि त्यादरम्यान विविध अपघातांत मृत्यू आणि जखमी प्रवाशांची संख्या २९२ एवढी होती. कल्याण स्थानक आणि त्या हद्दीत २५८, अंधेरी स्थानकात २२० आणि बोरिवली स्थानकात २०३ प्रवाशांचे अपघात झाले आहेत. दिवा स्थानकातही १४९ प्रवाशांना प्राण गमवावे लागले आहेत.

वातानुकूलित लोकलमुळे अपघातांना आळा?

वातानुकूलित लोकल गाडय़ा आणण्याचा निर्णय रेल्वेने घेतला. मात्र एक गाडी सेवेत येण्यासाठी बराच वेळ गेला आणि त्याची चाचणी घेऊन ताफ्यात दाखल करण्यासाठीही विलंबच झाला. या गाडय़ांना असणाऱ्या स्वयंचलित दरवाजामुळे लोकलमधून पडून होणाऱ्या अपघातांना आळा बसू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त वातानुकूलित लोकल गाडय़ा आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. २१० वातानुकूलित लोकल गाडय़ा येत्या काही वर्षांत येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2018 2:13 am

Web Title: mumbai suburban railway accident issue
Next Stories
1 ‘कोस्टल रोडला शिवसेनेचा विरोध आहे का?’
2 आम्ही मुंबईकर : व्रतस्थ तरुणांची चाळ
3 रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गावर ब्लॉक
Just Now!
X