सामान्य प्रवाशांसाठी लोकल सुरू करण्याची प्रवासी संघटनांची मागणी

मुंबई : लोकलअभावी खासगी वा वैयक्तिक वाहनांचा खर्चीक तर बेस्ट-एसटीचा बेभरवशाचा प्रवास परवडत नसल्याने केवळ नोकरीधंदा टिकविण्यासाठी नाइलाजाने घराबाहेर पडणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांचा वरचेवर उद्रेक होत आहे. लोकल प्रवासाची मुभा देण्याकरिता गेल्या दोन महिन्यांत मध्य व पश्चिम रेल्वेच्या पाच स्थानकांत प्रवाशांचा उद्रेक झाला. लोकलची गर्दी कमी करण्याकरिता कार्यालयीन वेळा बदलून का होईना सामान्यांसाठी लोकल सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

१५ जूनपासून ९५ अत्यावश्यक सेवा संस्थांच्या केवळ ३ लाख कर्मचाऱ्यांनाच सध्या लोकल प्रवासाची मुभा आहे. दुसरीकडे सप्टेंबरपासून खासगी कार्यालयांतील उपस्थितीची मर्यादा वाढविण्यात आली. त्यामुळे बेस्ट-एसटीवरील प्रवाशांचा ताण वाढत आहे. विरार, पनवेल, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ येथून मुंबईच्या दिशेने प्रवास करताना प्रचंड हाल होतात. स्थानिक पालिकांच्या बससेवाही अपुऱ्या असल्याने हालात भर पडते. हे हाल टाळण्यासाठी लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, या मागणीसाठी प्रवाशांच्या उद्रेकाची पहिली ठिणगी २२ जुलैला नालासोपारा स्थानकात पडली.

५ सप्टेंबरला बोरिवली स्थानकातील पूर्वेच्या दिशेने रात्री सवा दहाच्या सुमारास साधारण ४००च्या जमावाने प्रवेश करण्याचा प्रयत्न

केला. बोरिवली स्थानकाबाहेर बसगाडय़ांसाठी लांब रांगा लागल्या होत्या; परंतु बस वेळीच उपलब्ध न झालेल्या प्रवाशांनी थेट लोकल प्रवासाची मागणी करत स्थानकात घुसण्याचा प्रयत्न के ला होता.

हाच प्रकार सोमवारी विरार स्थानकात झाला. वसई-विरार येथून मुंबईतील कार्यालये गाठणे कठीण होते. एसटी बसेस मर्यादित असल्याने संतापलेल्या प्रवाशांनी विरार स्थानकात प्रवेश के ला आणि लोकल प्रवासाची मागणी के ली.

सामान्य प्रवाशांसाठीही लोकल सुरू करण्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे लोकल प्रवासासाठी उद्रेक होताना दिसतो. शासनाने याची दखल न घेतल्यास मंत्रालयासमोर प्रवासी संघटनांकडून आंदोलन के ले जाईल.

– नंदकु मार देशमुख, अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था

विरार, कल्याण, डोंबिवली येथून मुंबईच्या दिशेने प्रवास करताना प्रवाशांच्या नाकीनऊ येत आहेत. कार्यालयीन वेळा बदलून सर्वासाठीच लोकल सेवेत आणावी ही मागणी शासनाकडे के ली आहे. हा आमच्या रोजगाराचाही प्रश्न आहे.

– कै लास वर्मा, सचिव, मुंबई रेल प्रवासी संघ

अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांशिवाय अन्य प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा नाही. त्यामुळे घुसखोरीने किं वा अन्य प्रकारे प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न झाल्यास रेल्वे पोलिसांकडून अटकाव के ला जाईल.

– के . के . अशरफ, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त (आरपीएफ), मध्य रेल्वे