मुंबईकरांवर येत्या काही दिवसांमध्ये टॅक्सी भाववाढीचं संकट येण्याची शक्यता आहे. कारण मुंबई शहरातील टॅक्सी चालकांची सर्वात मोठी संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, मुंबई टॅक्सीमेन्स संघटनेने टॅक्सीच्या किमान भाड्यात तब्बल ८ रुपयांनी वाढ करण्याची मागणी केली आहे. संघटनेचे जनरल सेक्रेटरी ए.एल.क्वाड्रोस यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे पत्र लिहून मागणी केली आहे.

काही महिन्यांपूर्वी टॅक्सी संघटनेने परिवहन मंत्र्यांकडे किमान भाडं २२ रुपयांवरुन २५ रुपये करण्याची मागणी केली होती. मात्र सरकारकडून यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार २०१५ साली टॅक्सीचं किमान भाडं २१ रुपयांवरुन २२ रुपये करण्यात आलं होतं. यानंतर सीएनजीच्या भाड्यामध्ये किमान ५ वेळा वाढ करण्यात आली. याचसोबत इतर सर्व खर्चांमुळे टॅक्सी चालवणं सध्या जिकरीचं होऊन बसल्याचं क्वाड्रोस यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

टॅक्सी भाववाढीवर बसवण्यात आलेल्या खातुआ समितीही राज्य सरकारला प्रत्येक किलोमिटरमागे १ रुपये या दराने टॅक्सीचे दर पुन्हा एकदा जाहीर करण्याचा पर्याय सुचवला होता. मात्र सरकारने या अहवालावर अद्याप कोणतही पाऊल उचललेलं नाही. सध्याच्या परिस्थितीत सीएनजीच्या वाढत्या दरांमुळे २२ रुपयांमध्ये टॅक्सी चालवणं शक्य नसल्याचं सांगत, किमान भाडं ३० रुपये करण्याची मागणी टॅक्सीमेन संघटनेतर्फे करण्यात आली आहे. यावर राज्य सरकार काय पावलं उचलतंय हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.