मुंबई : मुंबई आणि परिसराला झोडपून तौक्ते वादळ सोमवारीच गुजरातच्या दिशेने सरकले असले तरी मंगळवारी सकाळीही शहर आणि उपनगरात पावसाच्या सरींनी हजेरी लावली.  तापमानात जवळपास ४ अंश सेल्सिअसची घट झाली. मे महिन्यातील निच्चांकी किमान तापमानाची नोंद मंगळवारी झाली. तौक्ते वादळामुळे सोमवारी मुंबईत मुसळधार पाऊस कोसळला. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्राने २०७.६ मिमि तर सांताक्रुझ केंद्राने २३०.३ मिमि पावसाची नोंद केली. पाऊस आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यांमुळे मुंबईच्या तापमानात घट झाली. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी किमान तापमान साधारण चार अंश सेल्सिअसने घसरले. मंगळवारी कुलाबा केंद्राने २५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद केली तर सांताक्रुझ केंद्राने २३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली. मुंबईतील मे महिन्यातील निच्चांकी किमान तापमानाची ही तिसरी नोंद आहे. यापूर्वी ८ मे २०१३ रोजी २३.६ अंश सेल्सिअस किमान तापमान मुंबईत नोंदवण्यात आले होते. आतापर्यंतची मे महिन्यातील सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद १२ मे १९८५ रोजी करण्यात आली असून त्या दिवशी मुंबईत २०.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले होते. पुढील दोन दिवस मुंबई आणि परिसरात  तुरळक सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.