गेल्या दशकभरात फेब्रुवारीतील चौथा थंड दिवस
दुपारी उन्हाचे चटके बसू लागले असले तरी शहरात पहाटेची पुन्हा गारवा वाढला आहे. गुरुवारी सांताक्रूझ येथे किमान तापमान १४.३ अंश से.पर्यंत खाली आले होते. गेल्या दहा वर्षांत फेब्रुवारीत फक्त तीन वेळा तापमान १४ अंश से.खाली गेले होते.
जानेवारीच्या अखेरच्या आठवडय़ापासून दुपारच्या तापमानात वाढ होत आहे. गेले चार दिवस कमाल तापमान ३२ अंश से.च्या घरात जात आहे. मात्र रात्री उशिरा ईशान्येकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढत असल्याने पहाटे गारवा जाणवत आहे.
गुरुवारी सांताक्रूझ येथे १४.३ अंश से. तर कुलाबा येथे १९.३ अंश से. किमान तापमानाची नोंद झाली. गेल्या दहा वर्षांत तीन वेळा फेब्रुवारीतील तापमान १४ अंश से.खाली गेले होते. त्याशिवाय गेल्या साठ वर्षांतील फेब्रुवारीतील सर्वात थंड दिवसाचा विक्रमही याच दशकात मोडला गेला. २००८ मध्ये ८.५ अंश से.ची तर २०१२ मध्ये ९ फेब्रुवारी ८.८ अंश से.ची नोंद झाली होती. १८ फेब्रु. २०१३ रोजी १३.२ अंश से.पर्यंत तापमान खाली उतरले होते.
त्यानंतर गुरुवारचे तापमान चौथ्या क्रमांकाचे आहे. पुढील दोन दिवसही सकाळी हवा थंड राहील, असा अंदाज मुंबई वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे. राज्याच्या अंतर्गत भागातही थंड हवा असून सर्वात कमी तापमान पुणे येथे ८.७ अंश से. नोंदले गेले.
दरम्यान, मुंबईतील प्रदूषणाचा आलेख आठवडय़ाभरानंतरही खाली आलेला नाही. वरळी व कुलाबा हे किनाऱ्याजवळचे भाग वगळता इतर उपनगरांत तसेच नवी मुंबईत प्रदूषणाची पातळी मर्यादित पातळीहून तीन पटीने अधिक वाढली आहे. या प्रदूषणासाठी २.५ मायक्रोमीटरपेक्षा कमी आकाराचे धूलिकणच कारणीभूत ठरत आहेत.

Untitled-2