मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद
शहरात पुन्हा एकदा थंडीने उचल खाल्ली असून गुरुवारी सांताक्रूझ येथे १५.६ अंश से. हे या मोसमातील सर्वात कमी तपमान नोंदले गेले. त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे ईशान्येकडून येणाऱ्या वाऱ्यांऐवजी आता उत्तरेतून थंड वारे येण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे उत्तरेतील थंडीचा कडाका राज्यात थेट पोहोचत आहे. बुधवारी रात्री आकाश निरभ्र असल्याने थंडीत वाढ झाली, यानंतर मात्र साधारण १७ ते १८ अंश से. तापमान राहील, असा अंदाज वेधशाळेने नोंदवला आहे.
डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासून मुंबईत थंडी स्थिरावण्यास सुरुवात झाली. आठवडय़ापूर्वी शनिवारी मुंबईतील तपमान १६.८ अंश से. वर घसरले होते. मात्र तेव्हा वाऱ्यांची दिशा ईशान्येकडून होती. त्यामुळे तपमानात पुन्हा वाढ होण्याचा वेधशाळेचा अंदाज खरा ठरला. आता वाऱ्यांनी दिशा बदलली आहे. उत्तरेतून वारे थेट दक्षिणेकडे येत आहेत. त्याचवेळी उत्तरेत थंडीचा कडाका वाढला असून राजधानी दिल्लीत गुरुवारी तापमान ५ अंश से. पर्यंत आले. ही थंडी वाऱ्यासोबत राज्यातही पोहोचत आहे. नाशिक येथे १२ अंश से. तपमान नोंदले गेले. थंड वाऱ्यांना निरभ्र आकाशाचीही साथ मिळाली. मुंबईवरील आकाशात बुधवारी रात्री एकही ढग नव्हता. ढगांच्या आच्छादनामुळे उष्मा हवेच्या खालच्या पातळीत अडकतो. मात्र हे आच्छादन नसल्याने तपमानात जास्त घट झाली. बुधवारच्या १९ अंश से. वरून तपमान थेट चार अंशांनी घसरून गुरुवारी १५.६ अंश से. वर आले, अशी माहिती वेधशाळेचे संचालक व्ही. के. राजीव यांनी दिली.
वाऱ्यांची दिशा बदलली असली तरी आकाश बुधवारएवढे स्वच्छ राहण्याची शक्यता कमी असल्याने तपमानात किंचित वाढ अपेक्षित आहे. पुढील दोन दिवस किमान तपमानात एक ते दोन अंशांनी वाढ होण्याची शक्यता मुंबई वेधशाळेने वर्तवली आहे.