दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात थंड हवेचा प्रभाव वाढणार असून मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ात किमान तापमानात घसरण होण्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. मुंबईतही पहाटेचा गार वारा बोचरा होण्याची शक्यता आहे. उत्तरेतील थंड वाऱ्यांमुळे आठवडय़ाच्या सुरुवातीला राज्यही गारठले होते. गेले दोन दिवस काहीसे उबदार झालेल्या हवेत पुन्हा थंडीचा प्रभाव जाणवणार आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ासह राज्याच्या इतर भागातही थंडीचा प्रभाव वाढू शकेल. मुंबईत शनिवारी सकाळी किमान तापमान १८.६ अंश से. तर कमाल तापमान ३२ अंश से. होते. पुढील दोन दिवसात हे तापमान दोन ते तीन अंश से. ने घसरण्याची शक्यता आहे. दरम्यान शनिवारी राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद नांदेड येथे, १० अंश सें. झाली.