13 December 2018

News Flash

गारठा उद्यापासून परतणार?

शुक्रवारी सकाळी मुंबईतील किमान तापमान २०.२ अंश से.पर्यंत पोहोचले होते.

प्रतिनिधिक छायाचित्र

ढगांमुळे दोन दिवस उकाडय़ात वाढ * मुंबईच्या तापमानात ३ अंश सेल्सिअसने वाढ

पाच दिवसांपूर्वीच या ऋतूतील सर्वात कमी तापमान अनुभवलेल्या मुंबईकरांना उन्हाळ्यातील घामाची आठवण यावी इतपत हवामानात बदल झाले आहेत. शुक्रवारी सकाळी मुंबईतील किमान तापमान २०.२ अंश से.पर्यंत पोहोचले होते. मुंबईसोबत कोकण किनारपट्टीवरही हीच स्थिती आहे, तर गारठलेल्या पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडय़ाला काही दिवस उबदार हवा मिळाली. हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढल्याने तापमानात वाढ झाली. मात्र शनिवारी रात्रीपासून ही स्थिती पूर्वपदावर येणार असल्याचा अंदाज केंद्रीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

पश्चिम दिशेला अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने किनारपट्टी तसेच अंतर्गत भागात समुद्रातील बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढेल व त्यामुळे तापमानात वाढ होईल, असा अंदाज गेल्या शनिवारी वर्तवण्यात आला होता. मात्र त्यानंतरच्या दोन दिवसांत तापमानात आणखी घट झाली होती. सोमवारी सांताक्रूझ येथे १३.६ अंश से. किमान तापमान होते. मात्र सोमवार रात्रीपासून बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव दिसू लागला. मंगळवारी किमान व कमाल तापमानात तीन अंश से. वाढ झाली. त्यानंतर प्रत्येक दिवशी तापमानात वाढ होत गेली व शुक्रवारी किमान तापमान तब्बल २०.२ अंश से.वर तर कमाल तापमान ३३.७ अंश से.वर पोहोचले. मुंबईप्रमाणेच कोकण किनारपट्टीवरील अलिबाग, डहाणू, रत्नागिरी येथेही किमान तापमान २० अंश से.हून अधिक राहिले.

पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडय़ातही किमान तापमानात वाढ झाली. गेल्या आठवडय़ात नाशिक, जळगाव, धुळे, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर येथे किमान तापमान १० अंश से.पेक्षा खाली घसरले होते. मात्र सध्या या ठिकाणचे किमान तापमान १४ ते १६ अंश से.दरम्यान आल्याने थंडीच्या लाटेची तीव्रता कमी झाली. विदर्भातील स्थितीत फारसा फरक पडलेला नाही.

थंडीमध्ये अशा प्रकारे तापमान कमी-जास्त होऊ शकते. सध्या दक्षिणेकडून बाष्पयुक्त वारे येत असून त्यामुळे तापमानात वाढ झाली असल्याची माहिती मुंबई हवामानशास्त्र विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

मात्र आता लवकरच ही स्थिती पूर्वपदावर येईल. शनिवारपासून हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी होऊ लागेल आणि त्यामुळे तापमानही पुन्हा जैसे थे होण्याची शक्यता असल्याचा अंदाज केंद्रीय हवामानशास्त्र विभागाने नोंदवला आहे.

हिवाळ्यात उत्तरेकडून जमिनीवरून येणाऱ्या कोरडय़ा वाऱ्यांचा प्रभाव असतो. हवेतील बाष्प उष्णता धरून ठेवते. मात्र हिवाळ्यात कोरडय़ा हवामानामुळे व निरभ्र आकाशामुळे सूर्य मावळल्यानंतर तापमानात वेगाने घसरण होते. सोमवारपासून मुंबई व पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाडय़ाचे वातावरण ढगाळ आहे. हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढल्याने तापमानात वाढ झाली. शुक्रवारी मराठवाडा, कोकण येथे कमाल तापमान १.६ ते ३ अंश से.ने अधिक होते. विदर्भात किमान तापमान सरासरीपेक्षा १.६ ते ३ अंश से.ने घसरले होते, तर मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी किमान तापमानात ५ अंश से.पेक्षा अधिक वाढ झाली होती. कोकणात किमान तापमान ३ ते ५ अंश से.ने वाढले होते.

First Published on January 13, 2018 4:35 am

Web Title: mumbai temperature increased by 3 degrees celsius