उकाडय़ात वाढ, गारव्याचा काढता पाय

मुंबई : मुंबईचे कमाल तापमान सोमवारी ३८ अंशांवर पोहोचल्याने गारव्याने काढता पाय घेतला आणि मुंबईकरांनी काहिली अनुभवली. शहराच्या तुलनेत उपनगरात आर्द्रतेचे प्रमाण कमी होते. मात्र शहरात दुपारी उकाडा वाढला आणि घामाच्या धारा वाहू लागल्या.

राज्यात सर्वाधिक कमाल म्हणजे ३८.१ अंश तापमानाची नोंद मुंबईत करण्यात आली. मोसमातील सर्वाधिक तापमान मुंबईत नोंदविण्यात आले. सांगली, सोलापूर या ठिकाणचा पाराही ३५ अंशापलिकडे पोहोचला. हवामान विभागाच्या अनुमानानुसार मंगळवारी मुंबईच्या किमान तापमानातदेखील वाढ होण्याची शक्यता  आहे. त्यानुसार किमान तापमान २४ अंश, तर कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस राहण्यीच शक्यता आहे. जमिनीलगत वाहणारे प्रभावी दक्षिण-पूर्व वारे आणि आर्द्रतेचे प्रमाण कमी असल्यामुळे मंगळवारीही तापमानात वाढ होणार आहे.

गेल्या चार दिवसांत राज्यभरातील कमाल तापमानात वाढ झाली होऊन पारा ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचला होता. त्यावेळी मुंबईचे तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअसपर्यंत होते. मात्र सोमवारी मुंबईच्या तापमानात अचानक मोठी वाढ झाली. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रावर रविवारी सायंकाळी कमाल तापमान ३२.६ अंश, तर सोमवारी सकाळी साडेआठ वाजता किमान तापमान १९.८ अंश होते. सायंकाळी साडेपाच वाजता मुंबईचे कमाल तापमान ३८.१ अंश सेल्सिअसवर पोहचले. कुलाबा येथे ३४.७ अंश तापमान नोंदविण्यात आले. सांताक्रूझ येथील कमाल तापमानात सरासरीपेक्षा ७.६ अंश, तर कुलाबा येथे सरासरीपेक्षा ५.३ अंश सेल्सिअसने वाढ झाली.

पारा चढल्यामुळे मुंबईकर सोमवारी उकाडय़ाने हैराण झाले. शहराच्या तुलनेने उपनगरात आर्द्रतेचे प्रमाण कमी होते. मात्र शहरात दुपारी उकाडा वाढला. गेल्या दहा वर्षांत मार्च २०१५ आणि २०१७ मध्ये मुंबईचे कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसपेक्षा वर गेले होते.

राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान १५ ते २० अंश सेल्सिअस दरम्यान होते. विदर्भात किमान तापमानात लक्षणीय घट झाली, तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात कमी किमान तापमान नागपूर येथे १२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

हवेचा दर्जा घसरला

मुंबईच्या प्रदूषणातही सोमवारी वाढ झाली. हवेचा गुणवत्ता निर्देशांक ‘वाईट’ होता. कुलाबा, वरळी, चेंबूर आणि भांडुप येथे हवेचा गुणवत्ता निर्देशांक वाईट स्तरावर तर मालाड, माझगाव, वांद्रे-कुर्ला संकुल चेंबूर येथे ‘अतिवाईट’ स्तर नोंदविण्यात आला.