बाष्प वाढल्याने गुरुवारी मुंबईतील कमाल तापमानात दोन अंशांची घट होऊन ते ३६.१ अंश से.वर आले. शुक्रवारीही पारा ३५ अंश से. दरम्यान राहाण्याचा अंदाज आहे.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून उर्वरित राज्यात दुपारचे तापमान ४५ अंश से. कडे झेपावत आहे. त्यातुलनेत कोकणपट्टय़ातील पारा वाढला नव्हता. समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांमध्ये बाष्प भरपूर असते. बाष्प उष्णता अधिक प्रमाणात धरून ठेवते, त्यामुळे तापमान वाढत नाही. कोकणात त्यामुळे महिनाभर दुपारीही पारा ३१ ते ३३ अंश से. दरम्यानच होता. मात्र राजस्थान व मध्य प्रदेशवरील वातावरणातील वाऱ्यांच्या चक्रीय स्थितीने राज्यातील वाऱ्यांची दिशा व प्रभावही बदलला. बुधवारी सकाळपासूनच राजस्थानच्या दिशेने येणाऱ्या कोरडय़ा उष्ण वाऱ्यांचा प्रभाव वाढून समुद्रावरील वारे क्षीण झाले. संध्याकाळी सांताक्रूझ येथे सापेक्ष आद्र्रता ३४ टक्के होती. महत्त्वाचे म्हणजे सूर्यास्तानंतरही हवेच्या उष्ण झळांनी मुंबईकर पोळत होते.