राज्यात गारठा असला तरी मुंबईतील किमान तापमानाने दोन दिवसांत पाच अंश से.ची उसळी घेतली असून दुपारचे कमाल तापमान ३२ अंश से.हून अधिक झाले आहे. नाशिकमध्ये ५.५ अंश से., पुण्यात ७.५, नागपूरमध्ये ७.१ अंश से. वर तापमान घसरलेले असतानाच मुंबईत मात्र शुक्रवारी पहाटेचे तापमानही १७ अंश से.हून अधिक होते.
उत्तरेत थंडीची लाट आली असून दिल्लीत किमान तापमान ४ अंश से.वर आले आहे. त्याचा परिणाम मंगळवारपासून राज्यातही जाणवू लागला. मुंबईतही बुधवारी तापमान १२ अंश से.वर घसरले होते. तर राज्याच्या अंतर्गत भागातील तापमान दहा अंशांखाली गेले होते. मात्र मुंबईतील तापमानाने त्यानंतर लागलीच उसळी घेतली. शुक्रवारी राज्याच्या इतर भागांत गारठा वाढलेला असतानाच कोकण किनारपट्टीवरील तापमान मात्र त्यामानाने उबदार राहिले. मुंबई, डहाणू, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात किमान तापमान २० अंश से.च्या दरम्यान होते. मुंबईत दुपारीची कमाल तापमानाने ३० अंश से.चा आकडा पार केला. सांताक्रूझ येथे ३२.२ अंश से. तर कुलाबा येथे ३२.८ अंश से. तापमानाची नोंद झाली.
गेल्या दहा वर्षांतील आकडेवारीनुसार जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवडय़ात कमाल तापमान ३५ अंशांपर्यंत जाताना दिसते. शतकातील जानेवारीतील विक्रमी कमाल तापमानाची नोंद २००६ मध्ये ३७.६ अंश से. झाली होती.