देशातील उत्तर भागात आलेली थंडीची लाट व उत्तरेकडून वाहत असलेले वारे यामुळे थंडीचा कडाका वाढणार असल्याचा हवामानतज्ज्ञांचा अंदाज खरा ठरला असून, नववर्षांच्या सुरुवातीलाच कोकण किनारपट्टीवरील अनेक भागांतील किमान तापमान सरासरीपेक्षा कमी झाले. उत्तर महाराष्ट्र व विदर्भातही किमान तापमानात एक ते तीन अंश से.ची घसरण झाली आहे. राज्यातील सर्वात कमी तापमान नाशिक येथे ८.२ अंश से. नोंदले गेले, तर मुंबईत सांताक्रूझ येथे या ऋतूतील सर्वात कमी तापमानाची (१४.१ अंश से.) नोंद झाली.

गेले काही दिवस दिल्लीसह उत्तर भारतात अनेक ठिकाणी दाट धुके पसरले आहे. ईशान्येकडून असलेली वाऱ्याची दिशाही बदलली असून आता उत्तर तसेच वायव्येकडून वारे वाहू लागले आहेत. या थंडीच्या लाटेचा परिणाम राज्याच्या काही भागात जाणवू लागला असून मंगळवारी सांताक्रूझ येथे १४.१ अंश से.पर्यंत खाली उतरले. डहाणू येथे १६ अंश से. तर रत्नागिरी येथे १६.६ अंश से. किमान तापमान नोंदले गेले. राज्यातील सर्वात कमी तापमान नाशिक येथे ८.२ अंश से. होते. पुणे येथे १०.८ अंश से. तर जळगाव येथे १०.२ अंश से. किमान तापमान होते. महाबळेश्वर, सातारा, औरंगाबाद, परभणी, अकोला, चंद्रपूर, नागपूर येथे किमान तापमान १२ अंश से.पर्यंत खाली गेले.

जानेवारीमध्ये मुंबईतील किमान तापमान साधारणत १२ अंश से.पर्यंत खाली उतरत असल्याचा अनुभव आहे. २९ जानेवारी २०१२ रोजी नोंदले गेलेले १० अंश से.पर्यंत हे गेल्या दहा वर्षांतील जानेवारीतील सर्वात कमी तापमान होते. गेल्या आठवडय़ापासून वाऱ्याची दिशा बदलल्याने कोकण तसेच विदर्भात काही ठिकाणी सरासरीपेक्षा तापमान कमी झाले. पुढील दोन दिवसांत या तापमानात किंचित वाढ होण्याचा अंदाज आहे, असा अंदाज मुंबई हवामान विभागाच्या संकेतस्थळावर वर्तवण्यात आला आहे.