दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यात संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सावात जय जवान गोविंदा पथकाने नऊ थरांची सलामी दिली. दरम्यान रायगड जिल्ह्यात दहीहंडी फोडताना पाचव्या थरावरुन कोसळून एका गोविंदाचा मृत्यू झाला. दादर येथील प्रसिद्ध जिवादेवाशी निवास मंडळाची दहीहंडी साईराम मित्र मंडळाने आठ थर रचून फोडली. चेंबूर येथे विघ्नहर्ता गोविंदा पथकाने आठ थर रचून हंडी फोडली. मुंबई आणि ठाण्यात वेगवेगळया ठिकाणी हंडी फोडताना थरांवरुन कोसळून ५१ गोविंदा जखमी झाल्याची माहिती आहे. यंदा बडया आयोजकांनी दहीहंडी उत्सवातून माघार घेतल्यामुळे मुंबईतल्या रस्त्यांवर दरवर्षीसारखा उत्साह दिसत नाहीय.

कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांबाबत असलेली कर्तव्यभावना जपण्यासाठी यंदाच्या उत्सवातून बडया आयोजकांनी माघारीचा निर्णय घेतला. मुंबईतील बरेच मोठे आयोजक दरवर्षी दहीहंडी उत्सवात उंचच उंच व्यासपीठ उभारून तेथे कलाकारांना बोलावतात. रोख पारितोषिके ठेवून विक्रमी थर लावण्यासाठी गोविंदा पथकांना प्रोत्साहन देतात.

मात्र या वर्षी नामांकित गोविंदा पथके आणि आयोजक यांनी माघार घेतली आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे महिनोन महिने तालमी करणारे गोविंदा मात्र नाराज झाले आहेत. निवडणुका जवळ आल्याने या वर्षी जास्त हंडय़ा लागतील, अशी पथकांना अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली आहे.

एका गोविंदाचा मृत्यू
रायगड जिल्ह्यात दहीहंडी उत्सवाला गालबोट लागले. दहीहंडी फोडताना पाचव्या थरावरून कोसळून एका गोविंदाचा मृत्यू झाला. अर्जुन खोत (२५) असे मृत गोविंदाचे नाव आहे. म्हसळा तालुक्यातील खरसई गावात ही घटना घडली.

गोविंदा नदीत बुडाला
दहीहंडीनंतर पाण्यात पोहण्यासासाठी गेलेला गोविंदा नदीत बुडाला. विजय दर्गे असे बेपत्ता गोविंदाचे नाव आहे. तळा तालुक्यातील कासेवाडी येथील ही घटना आहे. निर्माल्य नदीत सोडण्यासाठी हा गोविंदा गेला होता.