अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी मध्यरात्रीपासून रिपरिप सुरू असलेल्या पावसाने बुधवारी मुंबई, ठाणे परिसराला झोडपले. पावसाला सोसाटय़ाच्या वाऱ्याची साथ लाभल्याने मुंबई, ठाणे, पालघरमध्ये अनेक ठिकाणी पडझड झाली असून, सखल भाग जलमय झाले.

मुंबई, ठाणे परिसरात सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला संततधार पाऊस मंगळवारीही अधूनमधून विश्रांती घेत हजेरी लावत होता. मात्र, बुधवारी पहाटेपासून पावसाने जोर धरला आणि मुंबई, ठाण्यात दाणादाण उडवली. सखल भाग, रस्ते, रेल्वेमार्ग जलमय झाले आणि वाहतुकीचे सर्वच मार्ग पाण्याने रोखले. मुंबईत तब्बल १४१ ठिकाणी झाडे कोसळली. सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे अनेक इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या, तर पाणीगळती रोखण्यासाठी झोपडय़ांवर घातलेले प्लास्टिक उडून गेले.

करोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीने त्रस्त असलेल्या मुंबईकरांचे पावसामुळे अतोनात हाल झाले. मुंबई महापालिके ने ५ ऑगस्टपासून मुंबईतील सर्व दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिली होती. चार महिन्यांनी दुकान उघडण्यास परवानगी मिळाल्याने दुकानदार खूष होते. परंतु, पावसाने त्यांच्या आनंदावर विरजण घातले.

ठाणे शहरात ३६ तासांमध्ये (बुधवारी रात्री ८ वाजेपर्यंत) २६७ मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळून वाहनांचे नुकसान झाले. गायमुख, मानपाडा, डी-मार्ट, वंदना, वृंदावन, आंबेडकर रोड, आनंद पार्क, ऋतुपार्क, पातलीपाडा, ओवळा, आनंदनगर, कळवा सह्य़ाद्री सोसायटी, कोपरी, पाचपाखाडीतील टेकडी बंगला, वागळे इस्टेट आंबेवाडी आणि कोपरी परिसरात पाणी साचले होते. घोडबंदर भागात एक संरक्षक भिंत कोसळली. डोंबिवली पूर्व स्थानक परिसर, महात्मा फुले रस्ता, कल्याण शिवाजी चौकात पाणी साचले होते. भिवंडीतील कमला हॉटेल, कल्याण नाका, बाजारपेठ, कासार आळी, अंबिका नगर या ठिकाणी तीन ते चार फुटांपर्यंत पाणी साचले होते. बदलापूर आणि अंबरनाथमध्ये डझनभर झाडांची पडझड झाली असून अनेक भागात विजेचे खांब कोसळले.

पालघर जिल्ह्याला झाडेपले

मुसळधार पावसाने बुधवारी पालघर जिल्ह्याला झोडपले. पालघर तालुक्यासह डहाणू, तलासरी, वसई व विक्रमगड या तालुक्यांमध्ये बुधवारी पहाटे साडेतीन वाजल्यापासून मुसळधार पाऊस झाला. अनेक निवासी भागांत पाणी साचल्याने मोठे नुकसान झाले. वसई-विरार शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. वसई पूर्वेतील पांढरतारा पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. जिल्ह्यातील ग्रामीण भागांत अनेक घरांचे नुकसान झाले.

तलावांच्या पातळीत वाढ

मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या सातही तलावांमधील पावसाच्या हजेरीने पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्यांची चिंता काहीशी कमी झाली. पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार तलावांमध्ये बुधवारी सकाळी ६ वाजेपर्यंत ३३ हजार ४११ दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली. त्यामुळे तलावांतील जलसाठा पाच लाख ३९ हजार ३०७ दशलक्ष लिटरवर पोहोचला. बुधवारीही तलावक्षेत्रात पावसाचा मुक्काम कायम होता. बुधवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मोडकसागरमध्ये २८ मि.मी.,तानसामध्ये ६७ मि.मी., मध्य वैतरणामध्ये १४ मि.मी., तुळशीमध्ये ७४ मि.मी., तर विहारमध्ये ५१ मि.मी. पावसाची नोंद झाली.

दुकानांचे नुकसान

टाळेबंदीमुळे आधीच आर्थिक गर्तेत सापडलेल्या व्यापाऱ्यांना दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे पुन्हा मोठा फटका बसला आहे. दोन्ही बाजूची दुकाने उघडण्याची परवानगी मिळाल्यानंतर पहिल्याच दिवशी दक्षिण मुंबईतील आणि दादर परिसरातील अनेक दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे दुकानातील मालासह फर्निचरचे मोठे नुकसान झाले. त्यात मरिन लाईन, ग्रँट रोड, दादर, नाना चौक, परळ, गिरगाव चौपाटी आदी परिसरातील काही दुकानांचा समावेश आहे. ग्रँट रोडला पूर्वेकडील दुकानांमध्ये गुडघाभर पाणी भरले होते, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

दरड हटविण्यात अडचण

कांदिवली परिसरातील बांडडोंगरी येथील पश्चिम द्रुतगती मार्गावर मंगळवारी पहाटे कोसळलेली दरड दोन दिवसानंतर अद्यापही पूर्ण हटवण्यात आली नाही. मंगळवारी सायंकाळपर्यंत दरड काही प्रमाणात हटवून दोन मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या होत्या. उर्वरीत दरड काढताना डोंगराचा आणखी काही भाग कोसळण्याची शक्यता असल्याने भूवैज्ञानिकांचा तांत्रिक सल्ला एमएमआरडीए आणि महापालिके ने घेतला. मंगळवारी रात्री उशिरा आणखी एक मोठा दगड कोसळल्याने सध्या पश्चिम द्रुतगती मार्गावरील या टप्प्यातील वाहतूक बंद करण्यात आली.

पहिल्या दिवशी मॉल्स ग्राहकांविना

मुंबई : मुंबईत साडेचार महिन्यांनंतर मॉल्स पुन्हा सुरू झाले. मात्र जोरदार पावसामुळे अत्यंत मर्यादित ग्राहकांनी मॉल्समध्ये खरेदी केली. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे आणि पिंपरीत बुधवारी सुरू झालेल्या मॉल्सना अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही.

मॉलच्या प्रवेशद्वारावर अ‍ॅपद्वारे नोंदणी सुविधा, आरोग्य सेतू अ‍ॅपद्वारे पडताळणी आणि र्निजतुकीकरणाचे उपाय असे सुरक्षेचे सारे उपाय राबविण्यात आले. मॉलमधील सर्वच दुकानांनी पहिल्या दिवशी व्यवसायास सुरुवात केली नाही. तरीही जी दुकाने उघडी होती, त्यात अत्यंत कमी खरदी झाली. येथून कपडय़ांचीच खरेदी थोडय़ा प्रमाणात झाली.

शेअर बाजार नामफलकास फटका

सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे शेअर बाजाराच्या इमारतीवरील नामफलक कोसळले. जसलोक रुग्णालय इमारतीच्या बाहेरील बाजूचे पॅनेलही निखळून पडले. वेधशाळेच्या कुलाबा केंद्रावर ताशी ७० किमी वेगाच्या वाऱ्याची नोंद झाली. वाऱ्यांना क्षणिक तीव्रता मिळाल्याने त्यांचा वेग ताशी १०६ किमीपर्यंत पोहोचल्याचे हवामान विभागाने सांगितले.