मुंबई उपनगरसह ठाणे जिल्ह्यात २४ तासांत १०० मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असल्याची माहिती ‘आयमडी’ने सोमवारी दिली. याचबरोबर या भागांसगह कोकणातील अन्य भागात मुसळधार पावसाचा अंदाज देखील वर्तवला आहे.
ठाणे-बेलापूस औद्योगिक संस्था परिसरातील वेधशाळेने आज सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासांत २१३.४ मिमी पावसाची नोंद केली आहे.

मुंबई व आसपासच्या परिसरासह ठाणे/पश्चिम उपनगरात आज सकाळी साडे आठ वाजता मागील २४ तासांत अतिमुसळधार ११५.६ मिमी पावसाची नोंद झाली.  मुंबई, कोकणात आगामी चोवीस तासांत मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाचे मुंबईतील उपमहासंचालक के.एस.होसाळीकर यांनी ट्विटद्वारे सांगितले आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील सांताक्रुझ हवामान केंद्रात मागील चोवीस तासांत ११६.१ मिमी पावसाची आज(सोमवार) सकाळी साडेआठ वाजता नोंद केली आहे. तर दक्षिण मुंबईतील कुलाबा हवामान केंद्रात याच कालावधीत १२.४ मिमी पावसाची नोंद केली आहे.

रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे २४ तासांत ९० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर, पालघर जिल्ह्यातील डहाणू वेधशाळेने या कालावधीत ६०.३ मिमी पावसाची नोंद केली आहे. नाशिक येथील हवामान केंद्रात १३.४ मिमी पाऊस तर रत्नागिर केंद्र व हरनाई वेधशाळेने जिल्ह्यात ५.४ मिमी व ५.९ मिमी पावसाची अनुक्रमे नोंद केली. मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात याच कालावधीत ७.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

होसाळीकर यांनी म्हटले आहे की, सॅटेलाइट इमेजेसनुसार गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ भागात दाट ढग दिसत असून, या भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणातील इतर भागात शुक्रवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे. रविवारी अतिवृष्टीनंतर उपनगर मुंबईतील पवई तलाव ओसंडून वाहू लागला होता.