मुंबईत ९५३ नवे रुग्ण, ४४ जणांचा मृत्यू

मुंबई : मुंबईत मंगळवारी ९५३ रुग्णांचे नव्याने निदान झाले असून दुसऱ्या लाटेमध्ये प्रथमच मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या एक हजाराच्या खाली नोंदली गेली आहे.

दुसऱ्या लाटेमध्ये प्रतिदिन दहा हजारांवर गेलेली रुग्णसंख्या पहिल्यांदाच हजाराच्या खाली आली आहे. मृतांमध्येही घट झाली असून मंगळवारी ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत संसर्ग दुपटीचा कालावधी २५५ दिवसांवर गेला आहे. मंगळवारी शहरात १७ हजार चाचण्या झाल्या आहेत. २४ तासांत शोध घेतलेल्या बाधितांची संख्या १२ हजार ९८२ आहे. गेल्या आठवडय़ात ही संख्या सुमारे २० हजार होती. सध्या ७८ झोपडपट्टी किंवा चाळी प्रतिबंधित आहेत, तर शहरात सध्या ३०५ इमारती सीलबंद आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात ७६७ जण बाधित 

ठाणे जिल्ह्य़ात तौक्ते चक्रीवादळामुळे करोना चाचण्यांचे प्रमाण घटले आहे. मंगळवारी करोना रुग्णसंख्या एक हजारहून कमी आढळून आली. जिल्ह्य़ात मंगळवारी ७६७ करोना रुग्ण आढळून आले, तर ५० जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवली २२५, ठाणे १७२, मीरा-भाईंदर ११०, नवी मुंबई १०२, ठाणे ग्रामीण ७५, बदलापूर ३३, अंबरनाथ २१, उल्हासनगर १९ आणि भिवंडीत १० रुग्ण आढळून आले.