दोन विभागांत ९७ बाधित कर्मचारी; राज्यात ५०६ कर्मचाऱ्यांना करोना

मुंबई : राज्यातील परिवहन विभागाच्या कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण झाली आहे. मात्र ५० लाख रुपये आर्थिक मदतीचा नियम आरटीओला लागू नाही. आतापर्यंत राज्यात आरटीओचे ५०६ कर्मचारी करोनाबाधित झाले आहेत, तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांनाही मदत मिळावी, अशी मागणी परिवहन आयुक्त कार्यालयाने राज्य सरकारकडे केली आहे. करोनाबाधितांमध्ये सर्वाधिक मुंबई व ठाणे विभागाच्या आरटीओ कार्यालयातील ९७ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

गेल्या वर्षी करोना संसर्गामुळे जाहीर झालेली टाळेबंदी शिथिल होताच व आरटीओतील कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हळूहळू वाढ झाली. गेल्या काही वर्षांत रिक्त झालेल्या जागा, त्यामुळे अपुरे मनुष्यबळ व करोनामुळे कमी उपस्थितीतच कार्यालयात कामे होऊ लागली. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवरील ताणही वाढला आणि कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्यांशीही अधिक प्रमाणात संपर्क होऊ लागला.

राज्यात आतापर्यंत ५०६ कर्मचारी करोनाबाधित झाले असून यात मुंबई व ठाणे विभागातील आरटीओ कार्यालयातील सर्वाधिक कर्मचारी बाधित झाले आहेत. मुंबईतील मुख्यालय तसेच ताडदेव, वडाळा, अंधेरी, बोरिवली आरटीओतील ६१ कर्मचाऱ्यांना, तर ठाणे विभागातील ठाणे, कल्याण, वाशी, वसई आरटीओतील ३६ कर्मचारी बाधित झाले आहेत. पुणे विभागातील विविध आरटीओ कार्यालयांतील ७३ कर्मचारी, नाशिक विभागातील नाशिक, मालेगाव, अहमदनगर व अन्य आरटीओ कार्यालयातील ६९ जणांना लागण झाल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय राज्यातील पनवेल विभागात ३९ यासह कोल्हापूर, धुळे, औरंगाबाद, नांदेड, लातूर, अमरावती, नागपूर शहर व नागपूर ग्रामीण भागातील आरटीओ कार्यालयांनाही करोनाचा विळखा बसला आहे. मुंबई, ठाणे, सांगलीत प्रत्येकी एक आणि पुणे विभागात २ कर्मचारी करोनामुळे दगावले आहेत.

आरटीओ कर्मचारीही करोनाकाळात कार्यालयात उपस्थित राहून अत्यावश्यक सेवा देत आहेत. त्यांनाही करोना योद्धे किं वा आघाडीवरील कर्मचारी म्हणून ५० लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी शासनाकडे के ली आहे.

– अविनाश ढाकणे, परिवहन आयुक्त