06 August 2020

News Flash

रुग्णालये ओसंडली..

करोना संकटाशी लढताना यंत्रणांचा दुबळेपणा उघड

संग्रहित छायाचित्र

अमर शैला सदाशिव, जयेश सामंत

मुंबई, ठाण्यात खाटांअभावी उपचार अवघड; डॉक्टर आणि परिचारिकांची वानवा 

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या शहरांमध्ये करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढून रुग्णालये ओसंडून वाहत असताना उपचारांची गरज असलेल्या रुग्णांसाठी खाटा उपलब्ध नसल्याने करोनाशी लढणाऱ्या आरोग्य यंत्रणेलाच धाप लागली आहे. खाटांची मर्यादित संख्या, अपुरे डॉक्टर आणि परिचारिका अशा अभावग्रस्त युद्धभूमीवर या तिन्ही महानगरांमध्ये करोना संकटाशी लढताना यंत्रणांचा दुबळेपणा उघड होत आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत दररोज हजारोंच्या संख्येत रुग्णसंख्या वाढत असताना रुग्णवाहिका मिळाली तर रुग्णालयात प्रवेश नाही, प्रवेश मिळाला तर खाट नाही, खाट मिळाली तर उपचार करायला डॉक्टर-परिचारिका नाहीत, असे भीषण चित्र आहे. परिणामी, करोनाबरोबरच हृदयविकार, कर्करोग, क्षयरोग अशा गंभीर आजारांचे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या हालांना पारावार राहिलेला नाही.

पश्चिम उपनगरातील दहा रुग्णालयांनी अतिदक्षता कक्ष  उपलब्ध नसल्याचे कारण देत एका ७४ वर्षीय रुग्णाला प्रवेश नाकारल्याने प्राण गमवावे लागले. हृदयविकाराचा त्रास जाणवू लागताच कुटुंबीयांनी त्यांना दहा रुग्णालयांमध्ये फिरवले. काही रुग्णालयांतील डॉक्टरांनी रुग्णाला हातही लावण्यास नकार दिला, तर काहींनी रुग्णालयात प्रवेशही नाकारला. परिणामी एका बडय़ा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच या ज्येष्ठ नागरिकाने प्राण सोडले.

ठाण्यात रुग्णांना नकार

ठाण्यातही दररोज सरासरी १०० रुग्ण आढळत आहेत. परंतु, महापालिका आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात जेमतेम ३५० ते ४०० खाटांची क्षमता असल्याने झोपडय़ा, चाळी, निम्नस्तरीय वस्त्यांधील रुग्णांच्या बाबतीत रुग्णालयांची टोलवाटोलवी सुरू आहे.

मदत क्रमांक बिनकामाचा..

करोना रुग्णांना त्वरित खाटा मिळाव्यात यासाठी मुंबई महापालिकेने दूरध्वनी मदत क्रमांक उपलब्ध केला आहे. त्यावर संपर्क साधल्यावर कोणत्या रुग्णालयात किती खाटा उपलब्ध आहेत, याची माहिती मिळते. मात्र बहुतांश नागरिकांना याची माहिती नाही. कुणी संपर्क साधलाच तर पलीकडून योग्य माहिती, मार्गदर्शन केले जात नाही. त्यामुळे हा क्रमांक बिनकामाचा ठरत आहे.

१० रुग्णालयांचा नकार; रुग्णाचा वाटेतच मृत्यू

मुरली अदमाने यांना रविवारी छातीत दुखू लागले. त्यांना कांदिवली येथील एका रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांची प्राथमिक तपासणी केली गेली. डॉक्टरांनी हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान केले. परंतु उपचारांची सोय नसल्याचे सांगून त्यांना अन्यत्र हलवण्यास सांगण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांनी १० रुग्णालये गाठली, पण प्रत्येक ठिकाणी नकार मिळाला. बडय़ा रुग्णालयांनीही उपचारास नकार दिला. काही ठिकाणी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यावर किमान रुग्णालय परिसरात वाहन घेऊन जाणे कुटुंबीयांना शक्य झाले. मात्र डॉक्टरांनी हातही न लावता त्यांना माघारी पाठवले. दुपारी ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत हे कुटुंबीय मुरली यांना खाजगी वाहनातून एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात फिरवत होते. अखेर रात्री नऊच्या सुमारास मुरली यांचा मृत्यू झाल्याचे त्यांचे नातलग संजय डवरे यांनी सांगितले. ‘सुमारे सहा तास आम्ही रुग्णाला घेऊन फिरत होतो. काही रुग्णालयांनी तपासणी करण्यासही नकार दिला, तर काहींनी अन्यत्र नेण्यास सांगितले. वेळीच उपचार मिळाले असते तर त्यांचे प्राण वाचले असते,’ असा आरोप डवरे यांनी केला.

जमिनीवर झोपवून उपचार

वडाळ्यातील एका रिक्षाचालकाला श्वास घेण्यास अडचण जाणवू लागल्यावर त्याने केईएममध्ये सोमवारी करोनाची चाचणी केली. त्यात त्याला संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. खाट उपलब्ध नसल्याने बुधवारी अहवाल येईपर्यंत करोना कक्षाबाहेरील जमिनीवर झोपून हा रुग्ण उपचार घेत होता. त्याला मधुमेह आहे.

वडाळ्यातील एका रुग्णालाही असाच अनुभव आला. तो मंगळवारी केईएममध्ये दाखल झाला. गुरुवारी चाचणीचा अहवाल येईपर्यंत तोही जमिनीवर झोपून होता. त्यांना मधुमेह-रक्तदाबाचा त्रास आहे. कुटुंबीयांनी वारंवार मागणी केल्यावर त्यांना खाट दिली गेली. याबाबत ‘केईएम’चे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी, एका रुग्णाला दाखल केले आहे, इतके च सांगितले.

मदत क्रमांक बिनकामाचा..

करोना रुग्णांना त्वरित खाटा मिळाव्यात यासाठी मुंबई महापालिकेने दूरध्वनी मदत क्रमांक उपलब्ध केला आहे. त्यावर संपर्क साधल्यावर कोणत्या रुग्णालयात किती खाटा उपलब्ध आहेत, याची माहिती मिळते. मात्र बहुतांश नागरिकांना याची माहिती नाही. कुणी संपर्क साधलाच तर पलीकडून योग्य माहिती, मार्गदर्शन केले जात नाही. त्यामुळे हा क्रमांक बिनकामाचा ठरत आहे.

खाटांची स्थिती

खासगी आणि सरकारी व्यवस्थेमध्ये उपलब्ध खाटा (डीसीएच आणि डीसीएचसी मिळून) – ६,१३०

* उपचार सुरू असलेले एकूण रुग्ण – १९,९१६

* अतिदक्षता विभागातील खाटा – ५४०

ठाणे : शहरातील खासगी आणि शासकीय रुग्णालयांमधील खाटा ११५१

* एकूण रुग्ण : १७००

* दररोज वाढती संख्या : सरासरी १००

खाटा नसतानाही उपचारांचे ‘पॅकेज’?

महापालिकेने जाहीर केलेल्या शहरातील खासगी कोविड रुग्णालयात ७५० पेक्षा अधिक खाटा असल्या तरी ही रुग्णालयांमध्येही खाटा नसल्याचे चित्र आहे. सवलतीच्या दरात उपचारांसाठी राखीव असलेल्या खाटा भरल्याचे कारण देऊन येथे सर्वसामान्यांना दिवसाला चार ते सात हजार रुपयांच्या शुल्क आकारणीचे उपचार ‘पॅकेज’ पुढे केले जात असल्याच्या तक्रारी आहेत. हजार आणि दोन हजार खाटांच्या कोविड रुग्णालयाची गरज आतापासूनच व्यक्त होऊ लागली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 12:38 am

Web Title: mumbai thane treatment difficult due to lack of beds abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 शाळांच्या व्हॅनमधून आता करोना रुग्णांची वाहतूक
2 बदलापुरात करोना बाधित रुग्णांच्या संख्येत भर, ९ जणांचा अहवाल पॉजिटीव्ह
3 Coronavirus Outbreak : ठाणे जिल्ह्य़ात २६७ नवे रुग्ण
Just Now!
X