मुंबईतील करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे पालिका चिंतित झाली आहे. मात्र त्याच वेळी करोनामुक्त होण्याचे प्रमाण ९१ टक्क्यांवर स्थिरावली आहे. सलग तिसऱ्या दिवशी शुक्रवारी मुंबईतील नवे रुग्ण एक हजारांपेक्षा जास्त १०७४ असून १७ रुग्णांचा मृत्यू झाला.
मुंबईतील करोनाबाधितांची एकूण संख्या दोन लाख ८० हजार ८११ वर पोहोचली आहे. मात्र मृत्यू होण्याचे प्रमाण घसरले आहे. आतापर्यंत मुंबईतील तब्बल १० हजार ७५६ जणांचे मृत्यू झाले आहेत. दिवसभरात ३१३ रुग्ण करोनामुक्त झाले असून करोनामुक्तांची संख्या दोन लाख ५४ हजार ४४६ वर पोहोचली आहे. मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये १२ हजार ५८८ रुग्ण उपचार घेत आहेत. शुक्रवारी दिवसभरात तब्बल १७ हजार ९७३ चाचण्या करण्यात आल्या. रुग्ण दुप्पटीचा काळ १९५ दिवसांवर घसरला आहे.
ठाणे जिल्ह्य़ात ७६५ नवे रुग्ण
ठाणे जिल्ह्य़ात शुक्रवारी ७६५ नव्या बाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्य़ात एकूण रुग्णांची संख्या २ लाख २७ हजार ४१ इतकी झाली आहे. तर, दिवसभरात १२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांमध्ये कल्याण-डोंबिवली २०७, ठाणे शहरातील १८७, नवी मुंबई १४६, मीरा-भाईंदर ६२, ठाणे ग्रामीणमधील ५७, उल्हासनगर ४२, बदलापूरमधील ३२, भिवंडीतील २१ आणि अंबरनाथमधील ११ रुग्णांचा सामावेश आहे.
देशात ९३ लाख तर राज्यात १८ लाखांवर रुग्ण
गेल्या २४ तासांत देशभरात ४३०८२ लोकांना करोनाचा संसर्ग झाल्यामुळे, देशातील करोनाबाधितांची संख्या शुक्रवारी ९३ लाखांपलीकडे गेली आहे. बाधितांची एकूण संख्या शुक्रवारी ९३,०९,७८७ इतकी झाली. याचवेळी, ८७,१८,५१७ लोक संसर्गातून बरे झाले असून हे प्रमाण ९३.६४ टक्के आहे.
आतापर्यंत राज्यात १८ लाखांपेक्षा बाधित झाले असून, ४६,८९८ जणांचा मृत्यू झाला. तर गेल्या २४ तासांत राज्यात ६,१८५ नवीन रुग्णांचे निदान झाले. दिवसभरात नाशिक जिल्हा ३६१, पुणे शहर ४०६, पिंपरी-चिंचवड २२९, उर्वरित पुणे जिल्हा २६२, नागपूर शहर ३८० नवीन रुग्ण आढळले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 28, 2020 12:20 am