३५ वरून १४५ दिवसांवर

मुंबई : शहरातील नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून मुंबईचा रुग्ण दुपटीचा कालावधी १४५ दिवसांवर आला आहे. महिनाभरापूर्वी हा कालावधी ३५ दिवस होता. शहरात शनिवारी २,६७८ रुग्णांचे नव्याने निदान झाले आहे, तर ६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेने उच्चांक गाठला होता तेव्हा रुग्ण दुपटीचा कालावधी ३५ दिवसांचा होता. त्यावेळी दैनंदिन नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या सुमारे दहा हजार होती. महिनाभरात रुग्णसंख्येचा आलेख पुन्हा खाली जाऊ लागल्याने आता दैनंदिन निदान होणाऱ्या रुग्णसंख्येची संख्या कमी होत आली आहे आणि रुग्ण दुपटीच्या कालावधीतही चौपटीहून अधिक वाढ झाली आहे.

शनिवारी शहरात २,६७८ रुग्णांचे निदान झाले आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी १४५ दिवसांवर गेला आहे. शनिवारी ३,६०८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

ठाणे जिल्ह्यात दिवसभरात १,९६६ करोनारुग्ण ठाणे जिल्ह्यात शनिवारी १ हजार ९६६ नवे करोना रुग्ण आढळून आले, तर ६८ जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक मृतांची नोंद कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात (१८) नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ८६ हजार ७३७ करोनाबाधित आढळले असून ८ हजार तीन जणांचा मृत्यू झाला आहे.