मालाड येथील अक्सा बीचवर बुधवारी जीवरक्षकांच्या प्रसंगावधानामुळे तीन जणांचे प्राण वाचले. शेख अल्ताफ व्ही इक्बाल (३०), सर्फराज शेख आणि गणेश प्रसाद (२५) हे तीन मित्र आज सकाळी समुद्रातील खडकावर बसले होते. दरम्यानच्या काळात त्यांना भरतीमुळे पाण्याच्या वाढत्या पातळीचा अंदाज आला नाही. या प्रकाराची कल्पना येईपर्यंत ते बसलेला खडक पाण्याने वेढला गेला आणि तिघेही पाण्यात बुडू लागले. यावेळी किनाऱ्यावरील असणाऱ्या नथुराम सूर्यवंशी आणि स्वतेज कोळंबकर या जीवरक्षकांनी त्यांना मदतीसाठी धावा करताना पाहिले. क्षणाचाही विलंब न करता  नथुराम सुर्यवंशी आणि स्वतेज कोळंबकर त्यांच्या मदतीसाठी धावून गेले. नथुराम सूर्यवंशी यांनी खडकापर्यंत पोहत जाऊन तिघांनाही सुखरूप किनाऱ्यावर आणले. हे तिघेही मालवणी येथे राहणारे आहेत. जीवरक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार हे तिघेजण सकाळी समुद्रातील खडकावर बसले होते, त्यावेळी ओहोटी सुरू होती. मात्र, भरती सुरू होऊन चोहोबाजूंनी पाण्याने वेढले हे त्यांच्या पटकन लक्षात आले नाही. नथुराम सूर्यवंशी त्यांच्यापर्यंत पोहत गेले तेव्हा हे तिघेही प्रचंड घाबरले होते. अखेर २० मिनिटांच्या प्रयत्नानंतर या तिघांनाही सुखरूप किनाऱ्यावर आणण्यात आले.