मुंबईमधील बॉम्बे रुग्णालयातील दिपिका पंजाबी या ६९ वर्षीय महिलेला डॉक्टरांनी २०१६ च्या सुरुवातीलच डिस्चार्ज दिला आहे. मात्र साडेतीन वर्षांनंतर आजही त्या याच रुग्णालयामध्ये आहेत. मागील साडेतीन वर्षांपासून रुग्णालय प्रशासनाने अनेकदा प्रयत्न करुनही दिपिका रुग्णालय सोडून जाण्यास तयार नाहीत. त्यामुळेच आता प्रशासनाने थेट पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईमधील अनेक रुग्णालयांमधील वयस्कर रुग्ण डिस्चार्ज मिळाल्यानंतरही रुग्णालय सोडून जाण्यास तयार नसतात हा मुद्दा पंजाबी यांच्या प्रकरणामुळे पुन्हा प्रकाशात आला आहे. पंजाबी या २०१५ मध्ये जुलै महिन्यामध्ये मरिन लाइन्सला असणाऱ्या बॉम्बे रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. मणक्याला झालेल्या दुखापतीमुळे त्यांना सरळ बसायला आणि चालायला त्रास होत होता. डॉक्टरांनी त्यांच्यावर सहा महिने उपचार करुन त्यांना डिस्चार्ज दिला. त्यानंतरही पंजाबी यांच्या कुटुंबातील कोणतीच व्यक्ती त्यांना घरी घेऊन गेली नाही. इतकच नाही तर पंजाबी यांनाही घरी जाण्यात कोणताच रस दाखवला नाही.

रुग्णालय प्रशासनाने पंजाबी यांच्यावरील उपचार संपल्यापासून त्यांना कोणत्याही प्रकारचे दर त्यांच्याकडून आकारलेले नाहीत. दुसऱ्या मजल्यावरील जनरल वॉर्डमध्ये पंजाबी यांना दाखल करण्यात आले आहे. आता डॉक्टर पंजाबी यांची तपासणीही करत नाहीत. कधीकधी रुग्णालयातील आया त्यांचे डायपर बदलतात आणि त्यांना खाऊ घालून त्यांची रुम स्वच्छ करतात. पंजाबी यांचे काही नातेवाईक त्यांना अधूनमधून भेटायला येतात असं तेथील कर्मचारी सांगतात. मात्र रुग्णालयातील कोणी अधिकारी तेथे पोहचेपर्यंत ते गायब होतात. पंजाबी यांचे नातेवाई रुग्णलयाखालील औषधाच्या दुकानामध्ये त्यांच्या औषधांचे आणि जेवण खाण्याचे पैसेही अधूनमधून देऊन जातात. यासंदर्भात ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने पंजाबी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी मी चेंबूरची असून मला एक मोठी बहिण असल्याची माहिती दिली.

‘पंजाबी यांचे भाऊ-बहीण आहेत. पण त्यांना पंजाबी यांना घरी घेऊन जायचे नाहीय. आम्हीही मानवतेच्या दृष्टीकोनातून त्यांची काळजी घेतो. मात्र त्यांना रुग्णालयातील खाणे आवडत नाही हे स्पष्ट आहे,’ असं औषधाच्या दुकानात काम करणार्या जगदीश चौधरी यांनी सांगितले. ‘पंजाबी यांच्याकडे एक फोन असून त्यांचे नातेवाईक त्यांचे बील भरतात. पंजाबी यांना वेगवेगळ्या शाकाहारी हॉटेलमधून जेवण मागवून खायला आवडते. त्यांनी एक दोन वेळा पोलिसांनी फोन करुन आमची तक्रारही केली आहे,’ अशी माहिती त्यांना संभाळणाऱ्या हॉस्पीटलमधील परिचारिकेने दिली.

पंजाबी यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर एमएमल सराफ यांनी पंजाबी यांची हाडे ठिसूळ असण्याचा त्रास असल्याचे सांगतात. ‘उपचारानंतर त्यांचे हात-पाय पूर्णपणे काम करतात. त्यांना चालायचे असल्यास त्या चालू शकतात पण त्या मुद्दाम प्रयत्नच करत नाहीत. त्यांच्याशी बोलताना त्यांचा एक फ्लॅट जुने कर्ज फेडण्यासाठी विकण्यात आला. त्यानंतर त्यांना कोणताच निवारा राहिला नाही,’ असं सराफ यांनी सांगितलं. ‘कुटुंब रुग्णालय प्रशासनाची सहकार्य करत नाही आणि पोलिसांनीही मदत करण्यास असमर्थता दर्शवली आहे. अशी प्रकरणे पाहिल्यावर सरकारने अशा लोकांसाठी काहीतरी सोय करायला हवी,’ असं मत सराफ यांनी व्यक्त केले आहे.