निविदा प्रक्रिया लवकरच;सप्टेंबरपासून दिल्ली-भोपाळ मार्गावर टी-१८ धावणार

राजधानी आणि शताब्दी एक्स्प्रेसपेक्षाही मुंबई ते दिल्ली मार्गावर अत्याधुनिक सोयीसुविधांनीयुक्त अशी वेगवान टी-२० (ट्रेन २०२०)गाडी चालविण्यात येणार आहे. २०२० साली ही गाडी चालविण्याचे नियोजन रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आले असून त्याची निविदा प्रक्रिया येत्या काही महिन्यात सुरू करण्यात येईल, अशी माहिती चेन्नईतील रेल्वेच्या आयसीएफमधील (इंटिग्रल कोच फॅक्टरी) एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. येत्या सप्टेंबरपासून दिल्ली ते भोपाळ मार्गावर टी-१८ (ट्रेन-२०१८) वेगवान ट्रेन चालवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.

मुंबई ते दिल्ली आणि अहमदाबाद हा सर्वात व्यस्त आणि महत्त्वाचा मार्ग मानला जातो. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांसाठी राजधानी तसेच शताब्दीसारख्या वेगवान गाडय़ा चालवण्यात येत आहेत. यानंतर रेल्वे मंत्रालयाने ऑगस्ट २०१६ मध्ये टॅल्गोसारख्या वेगवान अशा गाडीचीही चाचणी घेण्यात आली होती. ताशी १६० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या या गाडीने मुंबई ते दिल्लीमधील १६ तासांचा प्रवास १३ तासांत पूर्ण केला होता. मात्र तांत्रिक कारणास्तव ही गाडी चालवणे रेल्वेला शक्य झाले नाही. अखेर रेल्वे मंत्रालयाने याला पर्याय म्हणून ट्रेन सेट (टी प्रकार) प्रकारातील वेगवान, सोयीसुविधांनी युक्त असलेली वातानुकूलित गाडी बनविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रथम टी-१८ या १६ डब्यांच्या एका गाडीची बांधणी आयसीएफमध्ये केली जात असून ही गाडी दिल्ली ते भोपाळ मार्गावर येत्या सप्टेंबरपासून चालवण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे.

त्यानंतर २०२० साली मुंबई ते दिल्ली मार्गावर अशा प्रकारची गाडी चालवण्याचे नियोजन रेल्वेकडून करण्यात आले आहे. वातानुकूलित असलेली ही गाडी २० डब्यांची आणि पूर्णपणे स्लीपर असेल. मुंबई ते दिल्ली मार्गावर ताशी १६० किलोमीटर वेगाने ती धावेल. त्यामुळे या मार्गावरील साधारण १६ तासांचा प्रवास वेळ दोन तासांनी कमी होईल. या गाडीसाठी काही दिवसांपूर्वी निविदा काढण्यात आली होती. मात्र तांत्रिक मुद्दय़ांमुळे ती रद्द केली. आता नव्याने निविदा काढली जाईल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. दिल्ली ते भोपाळ मार्गावर चालवण्यात येणारी टी-१८ प्रकारातील गाडी ही शताब्दी एक्स्प्रेसला, तर मुंबई ते दिल्ली मार्गावर चालवण्यात येणारी टी-२० गाडी राजधानी एक्स्प्रेसला पर्याय असेल.

  • ट्रेन सेट हे विदेशातील तंत्रज्ञान आहे. यामध्ये लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे डबे हे एकमेकांना कायमस्वरूपी जोडलेले असतात. जर मुंबई-दिल्ली मार्गावर २० डब्यांची गाडी धावणार असेल, तर त्याचे प्रत्येकी दहा डबे हे एकमेकांना कायमस्वरूपी जोडलेले असतील. त्यामुळे गाडीचा वेग वाढवण्यात मदत मिळते. या गाडीसाठी स्वतंत्र इंजिन नसते. ही गाडी पूर्णपणे मोटरकोचवर धावते.
  • मुंबई ते दिल्ली मार्गावर धावत असलेल्या राजधानी तसेच मुंबई ते अहमदाबाद मार्गावर धावणारी शताब्दी एक्सप्रेस ताशी १३० किलोमीटर वेगाने धावतात. टी-२० गाडीही तशाच पद्धतीने धावेल.

वैशिष्टय़े

  • राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेसपेक्षाही वेगवान
  • संपूर्ण वातानुकूलित गाडी आणि उत्तम आसनव्यवस्था, प्रसाधनगृह
  • वायफाय सुविधा
  • संपूर्ण काचेच्या खिडक्या
  • अपंग प्रवाशांसाठी व्हीलचेअर सुविधा
  • प्रवाशांना गाडीत वावरण्यासाठी अधिकाधिक मोकळी जागा
  • प्रथम आणि द्वितीय श्रेणी असे डबे
  • आकर्षक अंतर्गत सजावट