25 September 2020

News Flash

मुंबई-गोवा क्रूझ व्हाया रत्नागिरी

रत्नागिरीत थांबासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाची संबंधित क्रूझ कंपनीसोबत चर्चा

रत्नागिरीत थांबासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाची संबंधित क्रूझ कंपनीसोबत चर्चा

मुंबई ते गोवा जलमार्गावर सागरी पर्यटनाचा आनंद देण्यासाठी ऑक्टोबर २०१८ मध्ये सर्व सोयिसुविधांनी सज्ज असलेली आंग्रीया क्रूझ सेवेत आली. गोव्यापर्यंत थेट असणाऱ्या या सेवेचा पर्यटकांना कोकणातील पर्यटनस्थळांचाही आनंद लुटता यावा यासाठी रत्नागिरीत एक दिवस थांबा देण्यावर विचार केला जात आहे. या संदर्भात महाराष्ट्र सागरी मंडळाची क्रूझ सेवा असणाऱ्या संबंधित कंपनीसोबतही चर्चादेखील करण्यात आली. याशिवाय रायगड व मालवणमध्येही थांबा देण्याचा प्रयत्न आहे.

देशातील पहिल्या आंतरदेशीय आंग्रीया क्रूझला केंद्रीय रस्ते वाहतूक व बंदर विकासमंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या ऑक्टोबर महिन्यात हिरवा झेंडा दाखविला. मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे ही क्रुझ सेवा सुरू करण्यात आली असून यासाठी एका कंपनीला हे काम देण्यात आले आहे. क्रूझवर १०४ खोल्या असून ४०० र्पयटक यामधून प्रवास करू शकतात. तसेच डेक बार, रेस्ट्रो बार, डिस्को बार, जलतरण तलाव, स्पा, वाचनालय कक्ष यासह अनेक सुविधा क्रुझवर आहे.

मुंबई ते गोवा ते मुंबईपर्यंत थेट सेवा असल्याने यामध्ये रायगड, रत्नागिरी, मालवणमध्येही क्रूझला थांबा मिळण्यासाठी आता महाराष्ट्र सागरी मंडळही प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाचे रत्नागिरीतील भगवती बंदरमध्ये जेट्टी आहे. एक दिवस थांबा दिल्यानंतर र्पयटक रत्नागिरीत महत्त्वाच्या पर्यटनस्थळी भेट देऊ शकतील. सकाळी पर्यटनस्थळांना भेट दिल्यानंतर पुन्हा या क्रूझवर पुढील प्रवासासाठी परततील, अशी त्यामागील कल्पना आहे. येथे जेट्टी उपलब्ध असल्याने प्रथम रत्नागिरीतच क्रूझला थांबा देण्यासाठी विचार केला जाईल. क्रूझला थांबा मिळाल्यास येथील जेट्टीत आणखी सुविधा वाढविण्यात येतील. क्रूझला थांबा देण्यासाठी रायगड व सिंधुदुर्ग जिल्यातील मालवणमध्ये नव्याने जेट्टी उभारावी लागेल व त्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाकडून प्रयत्नही केले जात आहे. जेट्टी उभारल्यानंतरच रायगड व मालवणमध्येही रत्नागिरीप्रमाणेच थांबा मिळेल, असे मंडळाकडून सांगण्यात आले.

रायगड, कणकवलीचाही विचार?

मुंबई ते गोवा जलमार्ग प्रवास करताना सध्या पंधरा ते सोळा तास लागतात. क्रूझमधून हा प्रवास वेगवानही होऊ शकतो. परंतु र्पयटकांना क्रूझमधील सुविधांचा तसेच प्रवासाचा आनंद लुटता यावा यासाठी पंधरा ते सोळा तासांचा प्रवास वेळ निवडला आहे. पर्यटकांना कोकणातील पर्यटनस्थळांचा आनंद घेता यावा यासाठीही रायगड, रत्नागिरी व कणकवली थांब्याचा विचार केला जात आहे.

कशिद जेट्टीसाठी ३१० कोटींचा खर्च अपेक्षित

रायगडमध्ये काशिद येथे नव्याने जेट्टी उभारण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाला ३१० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, तर मालवमध्ये जेट्टीसाठी २१० कोटी रुपये खर्च येईल. जेट्टी उभारतानाच र्पयटकांसाठी अनेक सोयिसुविधाही असतील. दोन्ही ठिकाणी जेट्टी उभारणीसाठी साधारण एक ते दोन वर्षांचा कालावधी लागेल. त्यानंतर क्रूझला थांबा मिळू शकतो, असेही स्पष्ट करण्यात आले.

पर्यटनाच्या दृष्टीने मुंबई-गोवा क्रूझला एक दिवसासाठी रत्नागिरीतही थांबा मिळावा यासाठी संबंधित क्रूझ हाताळणाऱ्या कंपनीसोबत चर्चा करण्यात आली आहे. याशिवाय रायगड व मालवणमध्येही थांबा देण्याचा प्रयत्न आहे. या भागातील पर्यटनस्थळे पाहिल्यानंतर पुन्हा क्रूझमधून परतीचा प्रवास होईल, अशी त्यामागील संकल्पना आहे.    –विक्रम कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 12:29 am

Web Title: mumbai to goa cruise via ratnagiri
Next Stories
1 मेट्रोच्या कामांवर ड्रोनची नजर
2 वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी झाडांवर कुऱ्हाड
3 रोगापेक्षा इलाज भयंकर
Just Now!
X