सुशांत मोरे, मुंबई

मुंबई ते गोवा महामार्गावरील ११ महत्त्वाच्या टप्प्यांत खड्डे असून यंदाही गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास खडतरच असेल. पेण ते वडखळ नाका, इंदापूर ते पोलादपूर, चिपळूण या ठिकाणी खड्डय़ांमुळे वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागते आहे.

दरवर्षी गणेशोत्सवानिमित्ताने मुंबई, ठाणे, पालघरमधून कोकणाच्या दिशेने मोठय़ा संख्येने वाहने जातात. त्यामुळे मुंबई ते गोवा महामार्गावर वाहनांची एकच गर्दी होते. त्यातच मुंबई-गोवा महामार्गाची खड्डय़ांमुळे चाळण झाली आहे.  पेण ते वडखळ नाका, पळस्पे ते इंदापूर हा ८२ किलोमीटर पट्टा, खेड, चिपळूण ते हातखंबा हा २५ किलोमीटरचा भाग, अरवली येथील दीड किलोमीटरच्या भागांत खड्डय़ांची संख्या प्रचंड आहे. तारा ते जिते गावादरम्यान उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने सध्या सव्‍‌र्हिस रोड वापरात आहे. पण त्यावरही खड्डय़ांचे साम्राज्य आहे. याशिवाय डोलवी, वाकण, खांबे गाव भागांतही चालकांना खड्डय़ांचा सामना करावा लागतो. यापैकी इंदापूर ते पोलादपूपर्यंत ६० ते ७० ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत.

यासंदर्भात पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान (ठाणे परिक्षेत्र) यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी खड्डे बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते, रस्त्यांची कामे करणारे ठेकेदार व त्यांचे अभियंते यांच्याशी चर्चा करण्यात आली असून हा महामार्ग २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करण्यात येईल, असे सांगितले. तर महामार्ग पोलीस (मुख्यालय) अधीक्षक विजय पाटील यांनी मुंबई-गोवा महामार्गावर आमचे लक्ष असून खड्डय़ांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी सातत्याने पत्रव्यवहारही करण्यात आल्याचे सांगितले.

कशेडी घाट खचला

कशेडी घाटातील भोगाव येथील एक भाग खचला आहे. त्यामुळे या भागात महामार्ग पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. सध्या वाहतूक हळूहळू सुरू असली तरी गणेशोत्सव काळात कोणताही गोंधळ उडू नये यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.

एसटी-खासगी गाडय़ांकडे मोर्चा

कोकणाकडे जाणाऱ्या रेल्वेचे आरक्षण यंदाही फुल्ल झाल्याने अनेकांनी एसटी आणि खासगी गाडय़ांकडे मोर्चा वळवला आहे. एसटी महामंडळाने मुंबई, ठाणे, पालघरमधून २,२०० जादा गाडय़ा सोडल्या आहेत. २ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होत असून ३१ ऑगस्टपासून एसटीच्या एक हजारपेक्षा जास्त गाडय़ा कोकणसाठी रवाना होतील.