News Flash

Tejas Express: ‘तेजस’मध्येही काहींनी औकात दाखवली!, हेडफोन्सची चोरी, एलईडीची तोडफोड

हेडफोन्सही प्रवाशांनी लंपास केले आहेत.

On Tejas Express : पहिल्याच प्रवासात प्रवाशांनी 'तेजस एक्स्प्रेस'ची अक्षरश: दैना करून टाकली आहे.

काही व्यक्तींना नशिबाने अनेक चांगल्या गोष्टी मिळतात. मात्र, त्याच व्यक्ती आपल्या करंटेपणाने आणि वाईट सवयींमुळे या सगळ्यावर पाणी फेरतात, याचे मासलेवाईक उदाहरण सध्या ‘तेजस एक्स्प्रेस’च्या निमित्ताने अनुभवायला मिळाले आहे. गोव्याहून आपला पहिलाच प्रवास करून मुंबईत परतलेल्या या गाडीची अवस्था बघून रेल्वे अधिकाऱ्यांना धक्काच बसला. पहिल्याच प्रवासात प्रवाशांनी ‘तेजस एक्स्प्रेस’ची अक्षरश: दैना करून टाकली आहे. ‘तेजस एक्स्प्रेस’ मुंबईत परतली तेव्हा गाडीच्या डब्यांमध्ये लावण्यात आलेल्या अनेक एलईडी टीव्हींची प्रवाशांनी तोडफोड केल्याचे समोर आले. तसेच मनोरंजनासाठी देण्यात आलेले हेडफोन्सही प्रवाशांनी लंपास केले आहेत. याशिवाय, गाडीतील स्वच्छतागृह आणि इतर परिसरात पसरलेला कचरा पाहून अस्वच्छता हा भारतीय प्रवाशांच्या पाचवीला पुजलेला अवगुण आहे की काय, असेही जाणवले.

तेजस एक्स्प्रेस मंगळवारी दुपारी २.३० वाजता करमाळीहून मुंबईच्या दिशेने रवाना झाली होती. त्यानंतर साडेआठ तासांमध्ये गाडी सीएसटी स्थानकावर दाखल झाली होती. मात्र, या पहिल्याच प्रवासात गाडीत होणारी चोरी आणि तोडफोड पाहून रेल्वे अधिकाऱ्यांसमोर नवीनच समस्या उभी राहिली आहे. या गाडीच्या ‘इकॉनॉमी क्लास’मधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने हा संपूर्ण वृत्तांत कथन केला आहे. अनेक प्रवासी सीटसमोर लावण्यात आलेले एलईडी टीव्ही उचकटून काढण्याचा प्रयत्न करत होते. काहीजणांनी तर एलसीडी टीव्ही काढून बॅगेत भरले होते. मात्र, रेल्वे अधिकारी याठिकाणी वेळीच आल्यामुळे या प्रवाशांचा नाईलाज झाला. याशिवाय, गाडीत असणाऱ्या बायो आणि व्हॅक्युम स्वच्छतागृहांमध्ये प्रवाशांनी मोठ्य़ाप्रमाणवर घाण केल्याचे दिसून आले. स्वच्छतागृहांचा वापर केल्यानंतर अनेक प्रवासी फ्लश करत नव्हते. तसेच अनेक स्वच्छतागृहांमध्ये विष्ठा आणि कचरा जमिनीवर पसरला होता. त्यामुळे आता एकूणच प्रवाशांच्या मानसिकतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेली देशातील सर्वाधिक वेगवान ‘तेजस एक्स्प्रेस’ सोमवारपासून मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाली. मुंबई-गोवा मार्गावर धावणाऱ्या या रेल्वेचा वेग ताशी २०० किलोमीटर आहे. ‘तेजस एक्स्प्रेस’च्या प्रत्येक डब्याच्या निर्मितीसाठी ३.५० कोटी रुपये खर्च झाले आहेत. गाडीत अत्याधुनिक इलेक्ट्रोमॅटिक ब्रेकिंग सिस्टीम बसविण्यात आली आहे. या गतिमान गाडीत वेगवान वायफायची सुविधाही प्रवाशांना मिळणार आहे. १९ डब्यांच्या या एक्स्प्रेसमध्ये २ प्रथमश्रेणी वातानुकूलित चेअरकार डबे (५६ आसने) आहेत. सीएसटी येथून सुटणारी ‘तेजस एक्स्प्रेस’ आठवडय़ातून पाच दिवस धावणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सकाळी ५ वाजता सुटणारी ही एक्स्प्रेस उत्तर गोव्यातील क रमाळी येथे दुपारी १.३० वाजता पोहोचेल. दुपारी २.३० वाजता करमाळी येथून सुटणारी ही एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला रात्री ११ वाजता परतेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, पनवेल, रत्नागिरी, कुडाळ, करमाळी या स्थानकांवर ‘तेजस’चे थांबे असणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 9:58 am

Web Title: mumbai to goa on tejas express returns dirty passengers thrashed the lcd screens stole headphones
Next Stories
1 दक्षिण मुंबईत ‘चिपको’ आंदोलन!
2 वृक्षकत्तलीचा मुद्दा पुन्हा न्यायालयात
3 पेंग्विन कक्षाच्या विजेचा खर्च दरमहा १० लाख!
Just Now!
X