‘थर्टी फर्स्ट’ला मद्यप्राशन करून वाहन दामटविणाऱयांविरोधात वाहतूक पोलिसांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही कारवाईची मोहिम राबवली. मुंबईत यंदा ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’च्या आरोपाखाली एकूण ५३९ तळीरामांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त जावेद अहमद यांनी दिली. शहरात नाताळच्या आगमनापासून ते नववर्ष उजाडेपर्यंत नशेत तर्रर्र होऊन गाडी चालवण्याची पद्धत रुजत असल्याने या पद्धतीला आळा बसावा यासाठी वाहतूक पोलिसांकडून ९० हून अधिक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती.
ठाण्यात तर एकूण ७७५ तळीरामांना दंड ठोठावण्यात आला. ठाण्यात एका मद्यपीने वाहतूक पोलिसाने दंड आकारला म्हणून रागाच्या भरात स्वत:ची नवी कोरी दुचाकी जाळून टाकल्याचा प्रकार उघडकीस आला.
दरवर्षी नववर्षापूर्वी रेस्टॉरंट, हॉटेल, क्लब आणि बारमध्ये मोठय़ा प्रमाणात ‘पार्टी’चे आयोजन करण्यात येते. गेल्या काही वर्षांत हे प्रमाण अधिक वाढत आहे. यात १८ ते ३२ वर्षांतील तरुण तारुण्याच्या जोशात सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करत आहेत. हेल्मेट न घालणे, दारू पिऊन गाडी चालवणे, मित्रांसोबत शर्यत लावणे, यात गाडी बेदरकारपणे चालवणे यासाठी सातत्याने कारवाई होऊनही प्रत्येक वर्षी नाताळ काळात नशा करून गाडी चालवण्याची रीत सुरूच आहे. यावर उपाय म्हणून वाहतूक खात्यातर्फे महाविद्यालयांमध्ये जागृती शिबिरे घेतली जातात. तसेच पोलिसांकडून कारवाईची मोहिम देखील राबण्यात येते. तरीसुद्धा नशेत धुंद होऊन वाहन चालवणाऱया तळीरामांचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही.