मुंबईत आता हळूहळू पावसाने जोर धरायला सुरुवात केली आहे. सोमवारी पडलेल्या पावसामुळे तर मुंबईकरांची चांगलीच धांदल उडाली. उन्हाच्या काहिलीनंतर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिक खजी अर्थी सुखावले. पण सोबत छत्र्या किंवा रेनकोट नसल्याने अनेकांनी आसरा घेण्यासाठी सुरक्षित स्थळ गाठले.

पाऊस कमी झाल्यावर निवांत निघू, असे म्हणत अनेकांनी आपल्या ऑफिसमध्येच बसले होते. पण ही मुभा पोलिसांना नव्हती. मुसळधार पावसात वाहतूक कोंडी सोडवण्याची जबाबदारी त्यांच्यावरच होती. अशाच एका पोलीस कर्मचाऱ्याचा पावसात भिजत आपले कर्तव्य निभावत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. अचानक पडलेल्या पावसामुळे एकीकडे मुंबईकर धावपळ करत असताना वाहतूक पोलीस कर्मचारी नंदकुमार इंगळे हे मात्र भरपावसात भिजत होते. आणि आपले काम करत होते. या व्हिडिओला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळाला. लाईक्स आणि कमेंट्स चा पाऊस पडला.

मात्र या व्हिडिओची विशेष दखल घेतली ती महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी. त्यांनी आपल्या ट्विटरवरून या संदर्भात एक ट्विट केले. आपल्याला हिरो या शब्दाची व्याख्या थोडी अधिक व्यापक करण्याची गरज आहे. केवळ ज्यांचे मोठे पुतळे उभे राहतात, तेच हिरो नसतात, तर आपल्या समाजासाठी आणि नागरिकांसाठी आपले कर्तव्य इमानेइतबारे पार पाडतात, ते ही हिरो असतात. दैनंदिन जीवनात असे हिरो आपल्याकडे जेवढे जास्त असतील, तितके आपले जीवन सुकर होईल, अशा शब्दात त्यांनी त्या कर्मचाऱ्यांची स्तुती केली आहे.

दरम्यान, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्या कर्मचाऱ्याचे कौतुक केले.

कामाप्रति निष्ठा असणे यापेक्षा महत्वाचे काहीही नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी त्या कर्मचाऱ्याचे कौतुक केले आहे.