मुंबईत एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला महिला मारहाण करत असल्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये महिला कारवाई केल्याचा रागातून पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करताना दिसत होतं. यावेळी तिथे उपस्थित इतर लोकही हे सर्व पाहत उभे होते. महिला मारहाण करत असताना पोलीस कर्मचारी मात्र संयम बाळगून होता. समोर महिला असल्याने त्यांनी तिला कोणत्याही प्रकारे रोखण्याचा प्रयत्न केला नाही किंवा अडवणूक केली नाही. पोलीस कर्मचाऱ्याने दाखवलेल्या या संयमाबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला आहे. एकनाथ श्रीरंग पार्टे असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या घटनेची नोंद घेतली असून त्यांनी ज्या प्रकारे ही परिस्थिती हाताळली त्याबद्दल त्यांनी पार्टे यांचा सन्मान केला.

“मुंबई पोलीस दलातील वाहतूक शाखेचे हवालदार एकनाथ पार्टे यांना कर्तव्यावर असताना मारहाण झाली, ही बाब निषेधार्ह आहे. पार्टे यांनी संयम व धैर्याने परिस्थिती हाताळली. त्याबद्दल पार्टे यांचा सत्कार केला. पोलिसही माणूस असतो, त्यांच्या भावनांचा सन्मान करा असे मी नागरिकांना आवाहन करतो,” असं अनिल देशमुख म्हणाले. त्यांनी यासंदर्भात एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे.

पोलीस आयुक्तांकडूनही सन्मान

एकनाथ पार्टे मुंबई पोलीस दलात पोलीस हवालदार पदावर कार्यरत आहेत. एकनाथ पार्टे यांनी केल्लाय कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आलेला असून १० हजार रुपये आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित कुटुंबीयांचाही सत्कार करण्यात आला.

काय आहे नेमकं प्रकरण? 

मुंबईतील काळबादेवी परिसरात असलेल्या कॉटन एक्स्चेंज नाका येथे आपले कर्तव्य बजावत असताना एकनाथ पार्टे यांना महिलेने कॉलर पकडून मारहाण केली होती. वाहतुकीचे नियम मोडल्याने एकनाथ पार्टे यांनी संबंधित महिलेवर कारवाई केली होती. एकनाथ पार्टे यांनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याने तिने मारहाण केली असा महिलेचा दावा होता. या प्रकरणी आरोपी महिला आणि तिच्यासोबत आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे.