वाहतूक दंडवसुलीसाठी पोलिसांची कडक मोहीम

जयेश शिरसाट, मुंबई</strong>

ई-चलन दंडवसुलीसाठी विविध पर्याय आजमावून पाहणाऱ्या वाहतूक पोलिसांनी पावसाळा संपल्यानंतर धडक मोहीम हाती घेण्याचे ठरविले आहे. सुरुवातीला ज्या वाहनांवर जास्त दंड आहे ती हेरून लोखंडी सापळ्यात अडकवली जातील. चालक, मालकाने दंड भरेपर्यंत ही वाहने ‘स्थानबद्ध’ अवस्थेत राहाणार आहेत.

मुंबई वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अशा प्रकारची कारवाई केली जाते. मात्र ई-चलन बजावणी आणि प्रत्यक्ष दंड वसुली यात बरीच तफावत आहे. ई-चलन प्रणाली सुरू झाल्यापासून ही कारवाई कमी झाली. त्याऐवजी ई-चलनद्वारे दंड आकारला जाऊ लागला. मात्र दंडवसुलीच होत नसल्याने वाहतूक पोलिसांनी वाहनेच स्थानबद्ध करण्याची शक्कल लढवली आहे. वाहने जागच्या जागी अडकून पडली म्हणजेच अप्रत्यक्ष जप्त झाली की दंड चुकवणारे ताळ्यावर येतील, असा विश्वास आहे. पावसाळा संपला की शहरात धडक मोहीम हाती घेऊन सर्वत्र वाहने स्थानबद्ध करण्याची कारवाई हाती घेण्यात येईल.

पूर्वी वाहने अडवून जागीच दंड वसूल केला जात होता. पैसे नसल्यास परवाना, अन्य कागदपत्रे किंवा वाहन जप्त केले जात असे. सध्या सीसीटीव्हीद्वारे परस्पर चलन बजावले जाते. दंड लगेच भरावा, अशी सक्ती नाही. कागदपत्रे, वाहन जप्त होत नाही त्यामुळे दंड भरण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे चलन संबंधित चालकाच्या घरी जाऊन प्रत्यक्ष बजावण्याचा प्रयोग करण्यात आला. मात्र वाहतूक पोलिसांचे मर्यादित मनुष्यबळ आणि वाहन चालकांचे खोटे, अपुरे तपशील यामुळे हा प्रयोग काही दिवसांतच गुंडाळण्यात आला. चलन बजावण्याची जबाबदारी टपाल विभागावर सोपवण्याबाबतही चर्चा सुरू होती. मात्र आर्थिक वाटाघाटीत ही चर्चाही बारगळली. प्रादेशिक परिवहन विभाग आणि विमा कंपन्यांना हाताशी धरून वसुली करण्याचा वेग वाढवता येईल का, याची चाचपणी सुरू झाली. विम्याची मुदत वाढवताना, वाहन विकताना किंवा भंगारात काढताना या यंत्रणांकडील फेरी अटळ असते. अशा कोणत्याही कामांसाठी आलेल्या वाहनांवरील दंड शिल्लक आहे का, हे तपासून या यंत्रणा पुढील प्रक्रिया करतील. दंड शिल्लक असेल तर विमा किंवा अन्य कोणतेही काम वाहन चालक करू शकणार नाही. वाहतूक पोलीस दलाचे सहआयुक्त मधुकर पांडे यांनी दंड वसुलीतील दरी भरून काढण्यासाठी विविध उपाय योजण्याचे काम सुरू असल्याचे स्पष्ट केले. विमा कंपन्यांशी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

नऊ कोटींचीच दंडवसुली

गेल्या वर्षांची तुलना केल्यास ई-चलन बजावणीत अनेक पटीने वाढ झाल्याचे आढळते. प्रत्यक्षात वाहने किंवा बेशिस्त वर्तनाच्या प्रमाणात फारसा बदल झालेला नाही.२०१९च्या ऑगस्ट महिन्यापर्यंत दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांवर एकूण ४७ कोटींचा दंड ई-चलनद्वारे दंड आकारण्यात आला. त्यापैकी नऊ  कोटींचा दंड वसूल झाला असून ३७ कोटी दंड  वसूल करणे बाकी आहे. या नुसार ई-चलन बजावणी आणि प्रत्यक्ष दंड वसुली यातील तफावत ७८ टक्क्यांवर पोहोचली आहे.