21 September 2020

News Flash

उपनगरी रेल्वे गाडीची ‘बफर’ला धडक

सीएसएमटी स्थानकात फलाट क्रमांक एकवरील घटना

सीएसएमटी स्थानकात फलाट क्रमांक एकवरील घटना

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये (सीएसएमटी)आलेल्या एका लोकल गाडीने फलाट क्रमांक एकवरील बफरला (शेवट) धडक दिल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. यात मोटरमनने तातडीने लोकलचा ब्रेक लावला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. लोकलमधील प्रवाशांमध्ये मात्र घबराट पसरली.

बेलापूरहून निघालेली लोकल सीएसएमटी स्थानकात सकाळी ११.३० वाजता फलाट क्रमांक एकवर येत असतानाच ती बफरला धडकली. या धडकेमुळे मोटरमनच्या मागे असणाऱ्या महिला डब्यातील प्रवाशांना जोरदार धक्का बसला. काही प्रवासी डब्यातच पडले. लोकल थांबताच अनेक तात्काळ लोकलमधून उतरले व घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी, रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर धडकलेली लोकल हळूहळू मागे घेतली. या लोकलची पाहणी केल्यानंतर ती कारशेडमध्ये रवाना केली. मात्र हार्बरची सेवा यामुळे विस्कळीत झाली.

‘बफर’ म्हणजे काय?

स्थानकात लोकल येताच ती धडकू नये किंवा कोणताही गंभीर अपघात होऊ नये यासाठी फलाटात बफर लावलेले असतात. सीएसएमटी स्थानकातही प्रत्येक फलाटात बफर आहेत. या स्थानकात प्रवेश करणाऱ्या लोकल गाडीचा वेग ताशी १२ च्या वर गेला तर तात्काळ स्वयंचलित ब्रेक लागतो. त्यामुळे शुक्रवारी सीएसएमटी स्थानकात घडलेल्या घटनेमागील नेमक्या कारणाचा शोध घेतला जात आहे.

मोठी दुर्घटना नाही

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी ही मोठी दुर्घटना नसून यात कोणतेही नुकसान झाले नसल्याचे सांगितले. सीएसएमटीत लोकलचा ज्या ठिकाणी शेवट होतो, त्यापासून हे बफर तीन ते चार मीटपर्यंत अंतरावर असते. लोकल तिथपर्यंत थांबवण्याची परवानगीदेखील असते, असे ते म्हणाले.

प्रवाशांमध्ये घबराट

महिला प्रवासी उज्ज्वला जाधव या बेलापूर-सीएसएमटी लोकल गाडीतून मोटरमनच्या मागील महिला डब्यातून प्रवास करत होत्या. जाधव म्हणाल्या की, लोकलची धडक होताच काही प्रवासी डब्यातच पडले. डब्याला हादरा बसल्याने मलाही धक्का लागला. सर्व प्रवासी घाबरले आणि लोकल थांबताच नेमकी घटना काय घडली ते पाहण्यासाठी उतरलो. तेव्हा बफरला लोकल धडकल्याचे निदर्शनास आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2019 1:32 am

Web Title: mumbai train accident 2
Next Stories
1 रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक
2 सीएसएमटीऐवजी वडाळा-पनवेल जलद हार्बर?
3 आयआयटीमध्ये ‘स्टेम’ संकल्पना
Just Now!
X