कचऱ्याच्या आगीची झळ सिग्नल यंत्रणेला; रात्री उशिरापर्यंत वाहतूक विस्कळीत
ओव्हारहेड वायर तुटणे, सिग्नल यंत्रणेत बिघाड होणे, गाडी रुळावरून घसरणे, रेल्वे गाडीत तांत्रिक बिघाड होणे अशा विविध कारणांमुळे विस्कळीतपणासाठी प्रसिद्ध असणाऱ्या हार्बर रेल्वेने बुधवारीही आपली ही प्रथा कायम राखली. वडाळा स्थानकाजवळील रावळी जंक्शन येथे गोळा करण्यात आलेल्या कचऱ्याला आग लागल्याने सिग्रलची वायर जळाली. त्यामुळे हार्बर मार्गावरील वाहतुकीचा पार बोऱ्या वाजला. ऐन सायंकाळी गर्दीच्या वेळेत तब्बल ५० हून अधिक फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांमध्ये असंतोष उफाळून आला.
हार्बर मार्गावरील वडाळा स्थानकालगत असणाऱ्या रावळी जंक्शनला सायंकाळी ५.२५ वाजता कचऱ्याला लागलेल्या आगीची झळ सिग्नलच्या वायरला बसल्याने हार्बर रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने येणाऱ्या-जाणाऱ्या गाडय़ा जागीच खोळंबून राहिल्या. त्यामुळे विविध स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली. वाहतूक ठप्प झाल्याने अनेक उपनगरी गाडय़ा बराच वेळ एकाच जागी खोळंबल्या. काही प्रवाशांनी रिक्षा तसेच बस गाडीने जाण्याचा निर्णय घेतला. यात रिक्षा चालकांनी आपले हात धुवून घेतले. कुर्ला स्थानक परिसरातून नवी मुंबई गाठण्यासाठी प्रत्येक प्रवाशाकडून २०० रुपयांपेक्षा अधिक रक्कम आकारण्यात येत होती. अन्य पर्याय नसल्याने प्रवासीही बोटे मोडीत का होईना अधिक पैसे मोजून प्रवास करत होते. हा बिघाड काही वेळात दूर होईल अशा आशेवर रेल्वे स्थानकात बसून राहिलेल्या प्रवाशांना मोठा फटका बसला. रात्री ८.२१ च्या सुमारास सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त झाल्यानंतर सेवा हळूहळू रुळावर आली.

वारंवार सेवा विस्कळीत
गेल्या काही दिवसात ‘डीसी-एसी’ परिवर्तनानंतर हार्बर मार्गावरील सेवा अधिक सुरळीत होईल असा दावा केला जात होता. मात्र गेल्या दोन महिन्यांत हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.