पुलाच्या कामामुळे यंदाही शिवडी खाडीत रोहित पक्ष्यांचे दर्शन दुर्मिळ

शिवडी-न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या कामामुळे यंदा देखील  शिवडी खाडी परिसरात रोहित (फ्लेमिंगो) पक्ष्यांचे स्थलांतर  झालेले नाही. त्यामुळे मुंबईकरांना यंदाही ठाणे खाडी परिसरात जाऊन फ्लेमिंगो दर्शन करावे लागणार आहे. दरम्यान, २२ किमीच्या या पुलाच्या निर्मितीनंतर फ्लेमिंगो पक्ष्यांच्या स्थलांतराला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून, पुलाच्या सुमारे दोन किमी लांबीच्या मार्गिकेवर ध्वनिरोधक बसविण्याचा निर्णय एमएमआरडीए प्रशासनाने घेतला आहे.

याशिवाय संरक्षणात्मक  दृष्टीने भाभा आण्विक संशोधन केंद्राजवळून जाणाऱ्या पुलाच्या मार्गिकेवरदेखील दृष्टिरोधक बसविण्यात येणार आहेत. शिवडीचा खाडी परिसर हे फ्लेमिंगो पक्ष्यांचे हिवाळ्यातील निवासस्थान मानले जाते. लांब खाडीकिनारा, खारफुटीचे जंगल, खाण्यासाठी विपुल साठा आणि तुलनेने शांत ठिकाण यामुळे शिवडीच्या पाणथळीवर दरवर्षी येणारे हजारो फ्लेमिंगो गेल्या वर्षी मात्र आले नाहीत. जानेवारी महिन्यात ट्रान्स हार्बर लिंकच्या बांधकामाला सुरुवात झाल्यापासून फ्लेमिंगो पक्षी शिवडी खाडीत फिरकले नसल्याची नोंद पक्षी निरीक्षकांनी केली आहे. बांधकामाचा आवाज आणि साहित्याची ने-आण करण्यासाठी समुद्रात सातत्याने सुरू असलेल्या बोटींच्या फेऱ्यांमुळे फ्लेमिंगो या परिसरात उतरत नसल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या या परिसरात पुलाच्या बांधकामाने वेग पकडला असून समुद्राच्या दिशेने तात्पुरत्या पुलाच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वी तात्पुरत्या पुलाच्या बांधकामावरुन फ्लेमिंगो पक्ष्यांच्या थव्याला उडत जाताना पाहिल्याची माहिती सागरी अभ्यासक प्रदिप पाताडे यांनी दिली. मात्र बांधकामाच्या आवाजामुळे  पक्ष्यांचा थवा या ठिकाणी उतरला नसल्याची नोंद त्यांनी केली.

मात्र भविष्यात पुलाच्या निर्मितीनंतर फ्लेमिंगो पक्ष्यांच्या स्थलांतराला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून ‘एमएमआरडीए’ प्रशासन विशेष उपायोजना अमलात आणणार आहे. यासाठी शिवडी खाडी परिसरातून जाणाऱ्या सुमारे दोन किमीच्या मार्गिकेवर ध्वनिरोधक बसविण्यात येणार असल्याची माहिती ‘एमएमआरडीए’चे अतिरिक्त आयुक्त संजय खंदारे यांनी दिली. पुलावरून जाणाऱ्या गाडय़ांच्या आवाजाचा या पक्ष्यांना त्रास होऊ नये म्हणून, अशा पद्धतीच्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. शिवाय सुरक्षा आणि संवेदनशील बाबींच्या पाश्र्वभूमीवर भाभा आण्विक संशोधन केंद्राच्या परिसरातून जाणाऱ्या पुलाच्या दोन्हीं बाजूंनी दृष्टिरोधक बसविण्यात येणार आहेत.

पुलाचे काम वेगाने

प्रकल्पाचे काम तीन टप्प्यांमध्ये सुरू आहे. पहिल्या टप्प्यात १०.३८० किमी , दुसऱ्या टप्प्यात ७.८०७ किमी आणि तिसऱ्या टप्प्यात ३.६१६ किमी लांबीचा पूल उभारण्याचे काम एकाच वेळी सुरू आहे. पहिल्या टप्प्यात १२.२८ टक्के, दुसऱ्यात ५.३७ टक्के आणि तिसऱ्यात ५.४ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर २९०० मीटर लांबीच्या तात्पुरत्या पुलाच्या उभारणीचे ११ टक्के काम झाले असून भूगर्भ विषयक चाचण्यांसाठी समुद्रात आणि त्या बाहेरील क्षेत्रात ७५१ ठिकाणी बोअर होल खोदण्याचे काम पूर्ण झाले आहे.