तिन्ही बॉम्बस्फोटांचा कट एकाच वेळेस रचण्यात आल्याचा आणि आरोपींचा छडा कसा लावला गेला याचा उलगडा प्रकरणातील विशेष सरकारी वकील रोहिणी सालियान यांनी १० आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर केला. बॉम्बस्फोटानंतर भिवंडीतील पडघा गावातील काही तरुणांचे वर्तन संशयास्पद असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे पडघामध्ये नेमके काय सुरू आहे याचा छडा लावण्यास पोलिसांनी सुरुवात केली. त्याचाच भाग म्हणून काही तरुणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. त्या वेळेस काहींकडून स्फोटके, तर काहींकडून एके-५६ रायफल सापडल्या.
हिंदुत्ववादी विचारसरणीच्या नेत्यांच्या हत्येचा कट ते रचत असल्याचे त्यांच्या चौकशीतून उघड झाले. शिवाय या तरुणांना पडघाच्या जंगलामध्येच अत्याधुनिक शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याचेही समोर आले. त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेली शस्त्र आणि त्या जंगलातून सापडलेल्या गोळ्यांच्या पुंगळ्या त्याच शस्त्रास्त्रांच्या होत्या हेही न्याय्यवैद्यक प्रयोगशाळेतून निष्पन्न झाले. नाचन, अतीफ आणि हसीब या तिघांकडून ती शस्त्र हस्तगत करण्यात आली. एका आरोपीने चौकशीदरम्यान जंगलात शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याचा खुलासा केला. या तरुणांच्या चौकशीतूनच फरारी आरोपी ताहिर अन्सारी बॉम्ब विशेषकरून गावठी बॉम्ब बनवण्यात तज्ज्ञ होता, तर स्फोटांआधी वाहिद अन्सारी याच्या दवाखान्यात बॉम्ब ठेवण्यात आल्याचे उघड झाले. न्याय्यवैद्यक प्रयोगशाळेतील अहवालातून ते एकानेच बनवल्याचे स्पष्ट झाले. या बॉम्बस्फोटांच्या कटात केवळ मालेगाव, कल्याण आणि कुर्ला येथील तरुणांचाही समावेश होता. अभियंता असलेला मुझम्मिल याचा बॉम्ब ठेवण्यात महत्त्वाचा सहभाग होता. जेव्हा जेव्हा बॉम्बस्फोट घडवण्यात आले, त्या-त्या वेळेस तो आपल्या कार्यालयातून बेपत्ता असायचा ही बाब चौकशीदरम्यान उघडकीस आली. त्याला घशाचा त्रास असल्याने तो विशिष्ट पद्धतीने बोलायचा. त्यामुळेच बऱ्याचशा साक्षीदारांनी त्याची ओळख पटवली होती. सीएसटी-कर्जत लोकलमध्ये बॉम्ब असलेली बॅग ठेवताना एका प्रवाशाची बॅग पडली. त्या वेळेस त्यांच्यात संवाद झाला होता. तर विलेपार्ले येथील बाजारात बॉम्ब ठेवताना त्याच्या कार्यालयीन सहकाऱ्याची त्याच्याशी भेट झाली होती. तेथेही मोटारसायकलमध्ये बॉम्ब ठेवताना काहीजणांशी त्याचा वाद झाला. आरोपी खोत याने पडघातील विहिरीमध्ये बॉम्ब आणि शस्त्र ठेवल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तेथून सल्फरिक अ‍ॅसिड आणि अमोनियम नायट्रेट हस्तगत केले होते.या खटल्यात १५३ साक्षीदार तपासण्यात आले.

* या सगळ्यांमागे नाचनचा हात असल्याचे उघड झाल्यावर पोलीस त्याला अटक करण्यासाठी पडघ्यामध्ये गेले होते. त्या वेळेस तेथील रहिवाशांनी पोलिसांवर हल्ला केल्याने पोलिसांना रिकाम्या हाती परतावे लागले होते.
* नाचननेच उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्याला शरणागती पत्करण्याचे आदेश दिले. त्यानुसार एप्रिल २००३ मध्ये त्याने पोलिसांसमोर शरणागती पत्करली.

२७ जानेवारी २००३ : विलेपार्ले रेल्वे स्थानकाजवळ उभ्या असलेल्या सायकलवर ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन ३० जण जखमी झाले. स्फोटकांमध्ये तीक्ष्ण खिळ्यांचा वापर करण्यात आला होता. संध्याकाळी झालेल्या या स्फोटात जखमी झालेल्यांपैकी एका महिलेचा नंतर मृत्यू ओढवला.

१३ मार्च २००३ : लोकलमध्ये
ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा मुलुंड रेल्वे स्थानकात झालेल्या स्फोटात १० जण ठार तर ६५ हून अधिक जण जखमी झाले. हा सर्वात शक्तीशाली स्फोट होता.
*****
सर्व स्फोटांमध्ये सिमी या संघटनेचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय होता, २० हून अधिक जणांना पोलिसांनी अटक केली होती.

घटनाक्रम
६ डिसेंबर २००२ – मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळील मॅक्डोनाल्ड फास्ट फूड रेस्टॉरंट येथे एसीजवळ ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट झाला. स्फोटात २५ जण जखमी झाले. स्फोटात क्रूड बॉम्बचा वापर झाल्याचा संशय

कोण आहे साकीब नाचन?
साकीब नाचन याच्यावरील हा एकमेव दहशतवादाचा खटला वा आरोप नाही. ‘सिमी’ या बंदी घालण्यात संघटनेचा माजी महासचिव असलेल्या नाचनवर १९९१ सालापासूनच दहशतवादाचा आरोप ठेवण्यात आलेला आहे. सय्यद अब्दुल करीम ऊर्फ टुंडा आणि रियाज व यासिन या भटकळ बंधूंनंतर देशातील सर्वाधिक बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याच्यावर दोन बॉम्बस्फोट खटल्यांसह चार खुनाचे गुन्हे दाखल होते. कट्टर धार्मिक असलेल्या नाचनने ८०च्या दशकात अफगाण मुजाहिदीनच्या बाजूने रशियाविरोधातील युद्धात भाग घेतला होता. त्याच्यावर मुस्लिम तरुणांना पाकिस्तानात शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवण्याचे तसेच आयएसआयशी संबंध असल्याचा आरोप आहे. नाचनवर १९९१ मध्ये म्हणजे बाबरी मशीद पाडल्याच्या आधी दहशतवादाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात १९९२ ते २००१ या काळात तो कारागृहात होता.
दोन वकिलांची हत्या केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल झाल्यानंतर भिवंडी बार असोसिएशनने त्याचे वकीलपत्र घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे २००४ पासून नाचन न्यायालयात स्वत:ची बाजू स्वत: मांडत आहे.