मध्य रेल्वेवर रविवारी (दि.२५) विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे या मार्गावरील लोकल सेवा किमान सहा तासांसाठी बंद राहणार आहे. मध्य रेल्वेवरील वाहतुकीस अडथळे ठरणाऱ्या तीन रेल्वे फाटकांपैकी ठाकुर्ली येथे उड्डाणपूल बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. पहिला विशेष ब्लॉक अप आणि डाऊन फास्ट मार्गावर सकाळी ९.१५ ते दुपारी ३.५ पर्यंत असेल.

दुसरा विशेष ब्लॉक अंबरनाथ-बदलापूरमधील पुलाच्या पुनर्बांधणीसाठी घेण्यात येणार आहे. त्यामुळे अंबरनाथ आणि वांगणीतील अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ९.३० ते दुपारी २ पर्यंत ब्लॉक असणार आहे. या पुलासाठी चार गर्डर बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी डोंबिवली आणि कल्याण मार्गावरील सर्व सहा मार्गिकांवर ब्लॉक चालणार आहे. या ब्लॉकचा मेल, एक्स्प्रेस सेवांवरही परिणाम होणार आहे. त्यामुळे सुटीच्या दिवशी घराबाहेर पडणाऱ्यांनी गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेच्या ब्लॉकची वेळ पाहून बाहेर पडावे.

पश्चिम रेल्वे मार्गावर विरार ते वसईमध्ये शनिवारी रात्री १२ ते २. ३० पर्यंत अप फास्ट मार्गावर, तर रात्री १.३० ते पहाटे ४ पर्यंत डाऊन फास्टवर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गावरही रात्री ब्लॉक असणार आहे.