लोकल प्रवासासाठी आणखी प्रतीक्षा; दहा जिल्ह्यांत नियम कठोर

मुंबई : गेल्या आठवड्याच्या तुलनेत करोना रुग्णांचे प्रमाण घटले असले तरी मुंबईत तिसऱ्या टप्प्याचेच निर्बंध लागू राहणार आहेत. सध्याचे बाधितांचे प्रमाण पाहता मुंबई पहिल्या टप्प्यात असली तरी निर्बंध शिथिल होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना लोकल रेल्वे प्रवासाची आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून लागू असलेले निर्बंध शिथिल करण्यासाठी राज्य सरकारने दोन आठवड्यांपूर्वी निकष तयार केले होते. तेव्हा मुंबईत बाधितांचे प्रमाण (पॉझिटिव्हिटी रेट) पाच टक्क्यांपेक्षा जास्त होते. मात्र दोन आठवड्यांनी मुंबईतील परिस्थिती सुधारत असून बाधितांचे प्रमाण घटले आहे. मात्र तसे असले तरी मुंबईला तिसऱ्या टप्प्याचेच निर्बंध लागू करण्याचा महापालिका प्रशासनाचा विचार आहे. त्यामुळे दुकाने, आस्थापना, खासगी कार्यालये यांच्यावर सध्याचेच निर्बंध राहण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यातही मुंबईतील बाधितांचे प्रमाण ४.२० टक्के  होते आणि मुंबईचा  समावेश दुसऱ्या टप्प्यात झाला होता. तरीही निर्बंध शिथिल करण्यात आले नव्हते.

रुग्णसंख्या, प्राणवायू खाटांची व्याप्ती आणि संसर्गदर या आधारे जिल्ह्यांचा स्तर निश्चिात करण्याच्या धोरणानुसार येत्या सोमवारपासून मुंबईसह दहा जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहणार आहेत. निर्बंध लागू असलेल्या जिल्ह्यांच्या यादीत पालघर, सांगली, बीड, उस्मानाबाद चार नव्या जिल्ह्यांची भर पडली आहे. ठाणे ग्रामीणचा संसर्गदर पाच टक्क्यांपेक्षा कमी झाल्याने निर्बंध हटणार आहेत. संसर्गदर कमी झाला तरीही जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करायचे की कायम ठेवायचे याचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

कल्याण-डोंबिवलीतील दुकाने पूर्णवेळ 

कल्याण : कल्याण डोंबिवलीतील संसर्गदर घटल्याने महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी २१ जून (सोमवार) ते २७ जून मध्यरात्रीपर्यंत शहरातील दुकाने नियमित वेळेत खुली ठेवण्यास मुभा देण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. व्यापारी संकुले, सिनेमागृहे, नाट्यगृहे आणि उपाहारगृहे मात्र ५० टक्के क्षमतेने चालविण्यास परवानगी आहे. मैदाने, क्रीडांगणे, खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने आणि नियमितपणे सुरू राहतील. सरकारी कार्यालयातील उपस्थितीला १०० टक्के परवानगी असेल. सार्वजनिक कार्यक्रम ५० टक्के क्षमतेसह करता येतील. विवाह सोहळ्यास सभागृहाच्या क्षमतेप्रमाणे ५० टक्के आणि जास्तीतजास्त १०० व्हराडी उपस्थित राहू शकतील. स्तर पाचमधून येणाऱ्या आणि तेथे जाणाऱ्या प्रवाशांना ई पास बंधनकारक असेल.

राज्यात काय?

’पहिला स्तर : अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नंदूरबार, नाशिक, परभणी, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ.

’दुसरा स्तर : या स्तरात एकही जिल्हा नाही.

’तिसरा स्तर : पुणे ग्रामीण, सातारा, बीड, उस्मानाबाद, पालघर, सांगली आणि सिंधुदुर्ग. या गटात अत्यावश्यक सेवेतील आणि इतर सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत खुली राहतील. अत्यावश्यक वगळता अन्य दुकाने शनिवार-रविवार बंद राहतील. मुंबई शहराला या स्तरातच कायम ठेवण्यात आले आहे.

’चौथा स्तर : रायगड, रत्नागिरी, आणि कोल्हापूर. या तीन जिल्ह्यांमध्ये सायंकाळी ५ नंतर संचारबंदी राहील. दुकाने सकाळी ७ ते ४ पर्यंतच उघडी राहतील.

कारणे काय?

मुंबईत अजूनही दररोज ६०० ते ७०० जणांना करोना संसर्ग होत आहे. पुढील तीन-चार आठवड्यांत करोना साथीची तिसरी लाट येण्याचा इशारा देण्यात येत आहे. त्यासाठी पालिके ला सज्ज राहावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका निर्बंध शिथिल करण्याची शक्यता कमी आहे.

…तरीही पहिल्याच टप्प्यात 

’सरकारच्या निकषांनुसार या आठवड्यात मुंबईतील करोनाबाधितांचे साप्ताहिक प्रमाण ३.७९ टक्के  होते. तर प्राणवायूच्या २३.५६ टक्के  खाटा व्यापलेल्या आहेत.

’राज्य सरकारच्या निकषांनुसार मुंबईचा समावेश आता पहिल्या टप्प्यात झाला आहे. तरीही पालिके ने मुंबईला तिसऱ्या टप्प्याचेच निर्बंध लागू के ले आहेत.

’त्यामुळे सर्वसामान्यांना लोकल रेल्वे प्रवासाची मुभा देण्यास पालिका अद्यापही अनुकू ल नाही.

 मुंबईत ७६२ नवे रुग्ण

मुंबईत शुक्रवारी ७६२ रुग्णांची नोंद झाली, तर १९ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील रुग्णवाढीचा दर ०.०९ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. बाधितांचे प्रमाण अडीच टक्के  आहे. एका दिवसात ६८४ रुग्ण बरे झाले.