मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या राजाबाई क्लॉक टॉवर आणि ग्रंथालय इमारतीला युनेस्कोचा ‘एशिया पॅसिफिक कल्चरल हेरिटेज कन्झव्‍‌र्हेशन’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी बुधवारी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात स्वीकारला.

या प्रसंगी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, इंडियन हेरिटेज सोसायटीच्या अध्यक्षा अनिता गरवारे, युनेस्कोचे संचालक एरिक फाल्ट, टीसीएसचे एन. जी. सुब्रमण्यम, डॉ. ब्रिंदा सोमया, मुंबई विद्यापीठाचे प्र-कु लगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अनेक ऐतिहासिक वास्तू आणि संस्कृतीने मुंबई नटलेली आहे. मात्र यापैकी अनेक बाबी दुर्लक्षित आणि जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत आहेत.  आपल्याला लाभलेला हा ऐतिहासिक वारसा जोपासण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना वारसा चळवळीत सहभागी करून घ्यावे. शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या माध्यमातून ऐतिहासिक वारसा आणि संस्कृतीचे प्रशिक्षण देऊ न विद्यार्थ्यांना समृद्ध ऐतिहासिक वारशाची ओळख करून देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल राव यांनी केले.

भारतात एकूण ३८ ऐतिहासिक वारसा वास्तू असून त्यांपैकी राजाबाई क्लॉक टॉवर व ग्रंथालय इमारतीचा जीर्णोद्धार अत्यंत उत्कृष्टरीत्या केला आहे. देशाला लाभलेल्या ऐतिहासिक वारशाची शास्त्रोक्त मांडणी करून ऐतिहासिक वारसा पर्यटनाला चालना देण्याची गरज असल्याचे मत युनेस्कोचे संचालक एरिक फाल्ट यांनी व्यक्त केले.