कला शाखेत सर्वाधिक; विज्ञान शाखेची मात्र घसरण

मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची प्रथम वर्षांची पहिली प्रवेश यादी सोमवारी जाहीर झाली असून यंदा बहुतेक महाविद्यालयांचे कला शाखेचे कट ऑफ वाढल्याचे दिसत आहे. वाणिज्य शाखेचे कट ऑफही चढेच असून विज्ञान शाखेत मात्र घसरण झाली आहे. पारंपरिक अभ्यासक्रमांबरोबरच व्यावसायिक अभ्यासक्रमांकडेही विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे.

मुंबई विद्यापीठातील पदवी प्रथम वर्षांची पहिली प्रवेश यादी सोमवारी जाहीर झाली. गेल्या दोन वर्षांप्रमाणेच यंदाही अनेक नामांकित महाविद्यालयांचे पहिल्या यादीतील शेवटच्या प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे गुण (कट ऑफ) वाढले आहेत. मुंबई आणि परिसरातील महाविद्यालयांमध्ये गेल्या काही वर्षांप्रमाणेच यंदाही वाणिज्य शाखेचे कट ऑफ गुण हे चढेच आहेत. यंदा वाणिज्य शाखेसाठी आलेल्या अर्जातही साधारण दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील फेरीपासून वाणिज्य शाखेत प्रवेश मिळणे अधिक आव्हानात्मक होत जाणार आहे. वाणिज्य शाखेतही अकाऊंट्स अँड फायनान्स या स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढल्याचे दिसत आहे. बहुतेक महाविद्यालयांमध्ये या अभ्यासक्रमाचे कट ऑफ गुण एक ते दोन टक्क्यांनी वाढले आहेत. त्याशिवाय इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांकडेही विद्यार्थ्यांचा ओढा वाढतो आहे. यंदा बारावीचे निकालही चढे होते. परिणामी पहिल्या यादीवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. पहिल्या यादीतील कट ऑफ वाढल्यामुळे पुढील फेऱ्या अधिक चुरशीच्या होतील.

पारंपरिक अभ्यासक्रम शाखांमधील कला शाखेकडे गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला आहे. त्यामुळे कला शाखेच्या जागाही मोठय़ा प्रमाणावर रिक्त राहत आहेत. विद्यार्थ्यांचा एकूण प्रतिसाद कमी झाला तरीही विज्ञान किंवा वाणिज्य शाखेला प्रवेश मिळाला नाही म्हणून कला शाखा हा शिरस्ता मोडीत काढून चांगले गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची पावलेही कला शाखेकडे वळू लागली आहेत. अनेक महाविद्यालयांचे कला शाखेचे कट ऑफ गुण वाढल्याचे दिसत आहे. रुपारेल, साठय़े, मिठीबाई या महाविद्यालयांचे कला शाखेचे कट ऑफ गुण वाढले आहेत. अनेक महाविद्यालयांचे कला शाखेचे कट ऑफ ९० टक्क्यांपेक्षा अधिक आहेत. यंदा विज्ञान शाखेच्या गुणांमध्ये मात्र घसरण झाली आहे. विज्ञान शाखेचे कट ऑफ एक ते दोन टक्क्यांनी घसरले.

महाविद्यालयांचे अभ्यासक्रमानुसार ‘कट ऑफ’

(कंसात गेल्या वर्षीचे कट ऑफ – टक्केवारीमध्ये)

पोदार कॉलेज

वाणिज्य: ९३.६९ (९३.६०), बीएमएस: वाणिज्य ९४, कला ८६.३१, विज्ञान ८९.८०

रुईया कॉलेज

विज्ञान: ८५.०८ (८१.००), विज्ञान संगणक शास्त्र: ८८ (८५.६०), बीएससी बायोटेक: ८९.२ (९०.८०), बीएससी बायोकेमिस्ट्री: ८२ (८५.२३), बीएससी बायोअ‍ॅनॅलिटिकल सायन्स: ७४.६२ (७३.६९), कला (इंग्रजी माध्यम): ९१.८ (९३.००), बीएमएम: कला ९१.८ (८९.५०), विज्ञान ९० (९०.४०), वाणिज्य ९०.७५ (९०.००)

साठय़े कॉलेज

कला: ६६ (५०.३३), वाणिज्य: ८०.४६ (८५.८३), विज्ञान: ६६.६१ (७२.१६)

रुपारेल कॉलेज

कला: ९२.४६ (९०.४६), वाणिज्य: ८०.९२ (८२.७६), विज्ञान संगणक शास्त्र: ७६.९२ (७०.४६), विज्ञान: ८० (७३.८४), बीएमएस: वाणिज्य ८६.१५ (८७.०७), कला ७१.६९ (७०.७६), विज्ञान ७८.३० (८०.४६)

एस. के. सोमय्या कॉलेज

कला: ७० (७०), वाणिज्य: ७८ (८०), विज्ञान संगणक शास्त्र: ७० (६७.०८)

मिठीबाई कॉलेज

वाणिज्य: ९२.६२ (९०), कला: ९५.२४ (९४.८)

वझे केळकर कॉलेज

विज्ञान: ८१.८ (७६.१५), वाणिज्य: ८७.८ (८९.५४), कला: ८४.१५ (८४.७७) बीएमएमएम कला – ८२, वाणिज्य – ८६.३१, विज्ञान – ७८.६२

एमसीसी कॉलेज

वाणिज्य: ८५.६९ (८७), बॅचलर ऑफ अकाऊंट अँड फायनान्स: ८७.२२ (८७), बीबीआय: ८०.६२ (८१.४), बीएससी कॉम्प्युटर सायन्स: ६० (६०)

हिंदुजा कॉलेज

बीएमएस: कला ६५.०८ (७२), विज्ञान ७४.३१ (७७.८०), वाणिज्य ८९.०८ (९०), बीएमएम: कला ८२.७७ (७८.१५), विज्ञान ८१.८५ (६३.६४), वाणिज्य ८७.४ (८८), बीबीआय: ७९.२३ (८१.०८), बीएएफ: ८६.२० (८८), बीएफएम: ८५.३८ (८४)

भवन्स कॉलेज, अंधेरी

कला: ८०, विज्ञान: ७६.९२

खालसा महाविद्यालय

बीएमएस: ८२.४६ (८३.२३), बीएमएम: ७७.५३ (७०.९२), विज्ञान संगणक शास्त्र: ७१.३८ (७२.१५), बीएससी बायोटेक्नॉलॉजी: ६६.४६ (७८.४३), बीएएफ: ८०.४६ (८२.७७), बीएफएम: ७२.९२ (७०.२३), बीबीआय: ७४ (७५), वाणिज्य: ७९.६९ (८६), कला: ५५.८० (६४)