हॉटेलमध्ये उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकाच्या ‘व्हिडीओ’मुळे गोंधळ

दहिसर येथील इस्त्रा शाळेतून दहावीच्या ५१६ उत्तरपत्रिका चोरीला गेल्याचे प्रकरण ताजे असतानाच विलेपार्ले येथे एक शिक्षक चक्क हॉटेलमध्ये बसून उत्तरपत्रिका तपासत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, पुन्हा एकदा उत्तरपत्रिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

एक शिक्षक हॉटेलमध्ये बसून कॉफीचा मग आणि टीव्ही पाहत उत्तरपत्रिका तपासत असल्याचे दृश्य युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कॅमेरात कैद केले. या उत्तरपित्रका राज्य शिक्षण मंडळाच्या असल्याचा दावा युवा सेनेने केला आहे.

राज्य मंडळाच्या दहावी किंवा बारावीच्या उत्तरपत्रिका शिक्षकांनी शाळेत बसून मुख्याध्यापकांच्या देखरेखीखाली तपासण्याची पद्धत आहे. मात्र अनेकदा शिक्षक उत्तरपत्रिका घरी घेऊन जातात व त्यांच्या सोयीने तपासतात. अशाच चुकीच्या पद्धतीने उत्तरपत्रिका स्वत:जवळ ठेवणाऱ्या व्हिडीओमधील शिक्षकाने एका हॉटेलमध्ये बसून उत्तरपत्रिका तपासण्यास सुरुवात केली. यामुळे उत्तरपत्रिका तपासताना बाळगण्याच्या गोपनीयतेचे काय? यातील एखादी उत्तरपत्रिका गहाळ झाली तर त्याला जबाबदार कोण? असे प्रश्न उपस्थित करत युवा सेनेने राज्य मंडळाकडे धडक दिली.

युवा सेनेने पत्र लिहून ही बाब लक्षात आणून दिली आहे. मात्र व्हिडीओमध्ये तपासल्या जाणाऱ्या उत्तरपत्रिका राज्य मंडळाच्याच आहेत का हे स्पष्ट दिसत नसल्यामुळे याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.

माऊंट मेरी शाळेला कारणे दाखवा

बारावीची प्रश्नपत्रिका परीक्षेच्या वेळेआधीच व्हॉट्सअ‍ॅपवर व्हॉयरल केल्याप्रकरणी विरार येथील माऊंट मेरी शाळेचे मुख्याध्यापक आणि इतर काही कर्मचाऱ्यांना मुंबई पोलिसांनी  नुकतीच अटक केली होती. या शाळेविरोधात कारवाईसंदर्भात मंडळाच्या बठकीत निर्णय झाल्याची माहिती जगताप यांनी दिली. मंडळाच्या नियमांनुसार शाळेची मान्यता काढण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मात्र शाळेला त्यांचे म्हणणे मांडता यावे म्हणून कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली असून १५ दिवसांत त्यांना त्याचे उत्तर मंडळाकडे सादर करावे लागणार असल्याचेही अध्यक्षांनी स्पष्ट केले.

समिती नियुक्त

दहिसरमधील इस्त्रा शाळेतील उत्तरपत्रिका चोरी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विभागीय मंडळाने समिती नियुक्त केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास दहिसर पोलीस ठाण्यातर्फे सुरू आहे. ही समिती या चोरीच्या प्रकरणांवर अहवाल तयार करून मंडळाकडे सादर करणार असून त्यानंतर पुढील कार्यवाही निश्चित केली जाणार आहे.

व्हिडीओमधील शिक्षक कोण आहे व तो नेमक्या कोणत्या उत्तरपत्रिका तपासत आहे याची शहानिशा झाल्यावर पुढील कार्यवाही केली जाईल.  – दत्तात्रय जगताप, अध्यक्ष, विभागीय मंडळ