आणखी दोन आरोपींचा सहभाग उघड; पोलिसांकडून ५ उत्तरपत्रिका जप्त

मुंबई विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेचा घोटाळा गेल्या तीन वर्षांपासून सुरू असण्याची शक्यता पोलीस तपासात स्पष्ट होत आहे. अटक केलेल्या आरोपींनी २०१५ मध्येही विद्यार्थ्यांना पैसे घेऊन उत्तरपत्रिका मिळवून दिल्याचे मान्य केले असून, मात्र नेमक्या  किती विद्यार्थ्यांनी या घोटाळ्याच्या मदतीने आपले गुण वाढवून घेतले याचा शोध लावणे जवळपास अशक्य असल्याचे बोलले जात आहे. तीन वर्षांपासून उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग सुरू झाले असून त्याच्या साधारण एक वर्षांनंतर हा घोटाळा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, या घोटाळ्यात आणखी दोन आरोपींचा सहभाग उघड  झाला असून ते फरार आहेत. भांडुप पोलिसांनी आणखी पाच उत्तरपत्रिका जप्त केल्या असून, या उत्तरपत्रिकांवर असलेल्या क्रमांकाच्या आधारे विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांचीही चौकशी करून गरज पडल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

विद्यापीठातील अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांकडून १५ ते २०भांडुप पोलिसांनी आणखी पाच उत्तरपत्रिका जप्त केल्याजार रुपये घेऊन त्यांना उत्तरपत्रिका सोडविण्यासाठी घरी देऊन त्या पुन्हा परीक्षा विभागातील गठ्ठय़ांमध्ये  ठेवण्यात आल्या असल्याचा भांडाफोड भांडुप पोलिसांनी केला असून, त्यात एका विद्यार्थ्यांसह सात कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी हा प्रकार २०१५ पासून सुरू केल्याचे मान्य केले आहे. अभियांत्रिकी शाखेच्याच विद्यार्थ्यांना मागील वर्षी उत्तरपत्रिका मिळवून दिल्याचे स्पष्ट होत आहे, पण नेमक्या किती विद्यार्थ्यांचे काम करण्यात आले, याची माहिती मात्र लक्षात नसल्याचे या आरोपींनी  सांगितले आहे. त्यामुळे मागील वर्षी किती विद्यार्थ्यांनी गुण वाढवून घेतले, याचा तपास लागणे शक्य नसल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.

दोन कर्मचाऱ्यांना अटक होणार

पोलिसांना चौकशीत या घोटाळ्यात आणखी दोन कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून ते फरार झाल्याचे भांडुप पोलिसांकडून सांगण्यात आले. या दोन्ही आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी आणखी पाच उत्तरपत्रिका जप्त केल्या असून, या उत्तरपत्रिकाही अभियांत्रिकी शाखेच्याच आहेत. पोलिसांनी एकूण ९७ उत्तरपत्रिका हस्तगत केल्या असून त्यांच्यावर असलेल्या क्रमांकाच्या आधारे त्या कोणत्या विद्यार्थ्यांनी सोडवल्या, त्यांचे नाव आणि पत्ते पोलिसांनी विद्यापीठाकडे मागितले आहेत. विद्यार्थ्यांचे पत्ते मिळवून त्यांची चौकशी करण्यात येईल, तसेच गरज पडल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा विचारही करण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त (परिमंडळ सात) डॉ. विनयकुमार राठोड यांनी स्पष्ट केले.