विद्यापीठाच्या महाविद्यालयांना सूचना

मुंबई : आतापर्यंत झालेला निकाल गोंधळ सावरण्यासाठी आता महविद्यालयांना अधिक उत्तरपत्रिका तपासण्याची जबाबदारी उचलावी लागणार असून दीडपट उत्तरपत्रिका तपासण्याच्या सूचना विद्यापीठाने केल्या आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या निकालाची आणि परीक्षा विभागाच्या कामकाजाची सद्य:स्थिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत मांडली. या वेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. अर्जुन घाटुळे, प्रभारी कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य गौतम गवळी आदी उपस्थित होते.

निकालांमध्ये झालेल्या गोंधळानंतर विद्यापीठाने परीक्षा प्रक्रियेत आणि ऑनलाइन मूल्यांकन प्रणालीत काही बदल केले आहेत. विद्यार्थ्यांच्या आसन क्रमांकाबरोबर विद्यार्थी आणि विषयाच्या माहितीचा समावेश असेल. यामुळे परीक्षेतील गैरप्रकारांना आळा बसू शकेल, असे डॉ. घाटुळे यांनी या वेळी सांगितले. रखडलेले निकाल आता वेळेवर लावण्यासाठी महाविद्यालयांनाही अधिक भार उचलावा लागणार आहे. प्रत्येक महाविद्यालयाला त्यांच्याकडील विद्यार्थी संख्येच्या दीडपट उत्तरपत्रिकांची तपासणी करण्याच्या सूचना विद्यापीठाकडून देण्यात आल्या आहेत. विद्यापीठाने पुनर्मूल्यांकन आणि छायाप्रतीसाठीचे अर्ज ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे हे अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये जावे लागणार नाही. निकालाची सद्य:स्थिती शिक्षक आणि प्राचार्याना कळावी यादृष्टीने स्वतंत्र डॅशबोर्ड तयार करण्यात आला आहे.

‘निकालातील गोंधळास कारणीभूत ठरलेल्या ऑनलाइन मूल्यांकन प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्यात आल्या असून त्यामुळे निकालाच्या कामाचा वेग वाढला आहे. बदलांमुळे सर्व निकाल वेळेत जाहीर करण्यात मदत होईल, असे डॉ. शिंदे यांनी या वेळी सांगितले.

१८ परीक्षांचे निकाल अद्याप नाही

विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा सुरू झाल्या तरीही अद्याप गेल्या सत्रातील सर्व निकाल जाहीर झालेले नाहीत. हिवाळी सत्र परीक्षांच्या एकूण ४०२ परीक्षांपैकी अद्याप १८ परीक्षांचे निकाल रखडले आहेत, असे डॉ. घाटुळे यांनी सांगितले.