News Flash

विद्यापीठाचे दुसरे सत्र जानेवारीपासून; उन्हाळी सुट्टी केवळ १३ दिवसांचीच

सध्या महाविद्यालयांमध्ये पहिल्या सत्राच्या परीक्षा सुरू आहेत

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या सत्राच्या परीक्षा संपण्यापूर्वीच दुसरे सत्र सुरू होणार असून यंदा वर्षांअखेरीची उन्हाळी सुट्टीही अवघे १३ दिवस मिळणार आहे. या शैक्षणिक वर्षांचे दुसरे सत्रही ऑनलाइन सुरू करण्याची तयारी महाविद्यालयांनी सुरू केली आहे.

पहिले शैक्षणिक सत्र संपत आल्यानंतर अखेर मुंबई विद्यापीठाला वर्षांचे शैक्षणिक वेळापत्रक जाहीर करण्याची आठवण झाली. सध्या सुरू असलेले शैक्षणिक वर्ष (२०२०-२१) ७ ऑगस्टपासून गृहीत धरण्यात येणार आहे, तर ३१ डिसेंबरला पहिले सत्र संपेल. त्याचप्रमाणे दुसरे सत्र १ जानेवारी २०२१ पासून सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला असून शैक्षणिक वर्ष म्हणजे दुसरे सत्र ३१ मे रोजी संपेल.

सध्या महाविद्यालयांमध्ये पहिल्या सत्राच्या परीक्षा सुरू आहेत. जानेवारीच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत महाविद्यालयाच्या स्तरावर होणार आहेत. मात्र दुसरे सत्र १ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पहिल्या सत्राच्या परीक्षा संपण्यापूर्वीच महाविद्यालयांना दुसऱ्या सत्राच्या तासिका सुरू कराव्या लागणार आहेत. दोन सत्रांच्या दरम्यान मिळणारी सुट्टीही यंदा मिळणार नाही.

१३ जूननंतर पुढील शैक्षणिक

दरवर्षी जवळपास महिनाभर शैक्षणिक वर्षांअखेरची सुट्टी म्हणजे उन्हाळी सुट्टी मिळते. मात्र, सध्या विद्यापीठाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार फक्त १३ दिवस उन्हाळी सुट्टी मिळणार आहे. १ ते १३ जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी मिळणार असून त्यानंतर लगेचच पुढील शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात येणार आहे. यंदा मुळातच शैक्षणिक वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले नसल्यामुळे वर्षभरातील सुट्टय़ांबाबत संभ्रम होता. त्यातच उन्हाळी सुट्टीचा कालावधीही घटल्यामुळे वेळापत्रकाबाबत प्राध्यापकांमध्ये नाराजी आहे. त्याचप्रमाणे पहिले सत्र ७ ऑगस्टपासून सुरू झाल्याचे गृहीत धरताना जुलैमध्ये अध्यापन सुरू केलेल्या महाविद्यालयांचे काय असाही प्रश्न प्राध्यापकांनी उपस्थित केला आहे.

प्रथम वर्षांबाबत संदिग्धता

अभियांत्रिकी, वास्तूकला, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र, विधि, शिक्षणशास्त्र यांसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रथम वर्षांची प्रवेश प्रक्रियाही अद्याप सुरू झालेली नाही. वारंवार लांबणीवर पडलेली प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यास फेब्रुवारी उजाडण्याची शक्यता आहे. त्यानुसार या अभ्यासक्रमांचे पहिले सत्रच फेब्रुवारीपर्यंत सुरू होऊ शकणार नाही, असे असताना या अभ्यासक्रमांसाठीचे शैक्षणिक वेळापत्रक कसे असणार याबाबत संदिग्धता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2020 3:16 am

Web Title: mumbai university declares summer vacation only for 13 days zws 70
Next Stories
1 ‘टीआरपी’ विश्लेषणाच्या पद्धतीतच बदल
2 राष्ट्रीय उद्यानात आज नवीन वाघाचे आगमन
3 खेळण्यांवर ‘आयएसआय’ नमूद करणे बंधनकारक
Just Now!
X